हरयाणा आणि जम्मू-कश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दोन्ही राज्यांतील विधानसभेचा निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. त्याआधी एक्झिट पोल समोर आले असून हरयाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार दहा वर्षांनंतर काँग्रेस सत्तेत येताना दिसत आहे. तर जम्मू-कश्मीरमध्ये इंडिया आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि नॅशल कॉन्फरन्स या दोन पक्षांची सरशी होताना दिसत असून केंद्रातील सत्ताधारी भाजपला हा मोठा धक्का आहे.
हरयाणात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनेल आणि स्वबळावर सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. सलग दोन वेळा सरकार स्थापन करणारा भाजप बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 46 जागांच्या आकड्यापासून खूपच दूर असल्याचे दिसत आहे.
कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत देशभरात उत्सुकता आहे. दरम्यान, तीन टप्प्यांत झालेल्या जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार जम्मू-कश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची इंडिया आघाडी सर्वात मोठी आघाडी ठरण्याची शक्यता आहे, तर भाजपला दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागणार आहे.
जम्मू-कश्मीरमध्ये ‘इंडिया टुडे-सी व्होटर्स’च्या सर्व्हेनुसार काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला 40 ते 48 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला 27 ते 32 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय पीडीपीला 6 ते 12, तर अपक्षांना 6 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. ‘इंडिया टीव्ही-सीएनएक्स’ च्या पोलनुसार भाजपला 24 ते 34 जागा, काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला 35 ते 45 जागा आणि पीडीपी तसेच अपक्षांना मिळून 16 ते 26 जागा मिळण्याची शक्यता आहे.
हरयाणात ‘पीमार्क’च्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 51 ते 61 जागा आणि भाजपला 27 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. ‘पीपल्स पल्स’मध्ये काँग्रेसला 49 ते 61 जागांवर तर भाजप 20 ते 32 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. ‘एनडीटीव्ही’च्या पोलनुसार काँग्रेसला 55 आणि भाजपला 25 जागा तर ‘इंडिया टीव्ही’च्या पोलनुसार काँग्रेसला 44 ते 54 जागा आणि भाजपला 19 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे.