आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवून ती वाढविण्यात येईल. तसेच जातनिहाय जनगणना करणारच. यासाठी इंडिया आघाडी कटिबद्ध आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कितीही विरोध केला तरी आम्ही हे काम संसदेत केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी आज कोल्हापूर येथे आरक्षणाचे जनक, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारक स्थळी अभिवादन केले. त्यानंतर संविधान सन्मान संमेलनात ते बोलत होते.
संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा या मूळ मंत्राकडे लक्ष वेधत राहुल गांधी यांनी आजची समाज व्यवस्था आणि भाजप धोरणावर जोरदार हल्ला चढवला.
देश सुपरपॉवर कसा बनेल?
कला, कौशल्य, अनुभव असलेल्यांना मागे ठेवले जात आहे. शालेय अभ्यासक्रमात दलित, मागास, वंचित वर्गाचा इतिहास पूर्वीप्रमाणे शिकवला जात नाही. एक-दोन ओळीतच शिकवला जात आहे. शिक्षण क्षेत्रावर काही विशिष्ट लोकांचा पगडा आहे. गरिब घरातील मुलाला डॉक्टर, वकील, इंजिनिअर व्हायचे आहे; पण त्यातील काहीजणांचेच स्वप्न पूर्ण होते आणि बाकीच्यांचे मोडीत निघते. अशा परिस्थितीत देश सुपर पॉवर कसा बनेल? असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
आरक्षण संपवले जात आहे
आज अदानी, अंबानींच्या मॅनेजमेंटमधील यादी बघितली तर दलित, आदिवासी, ओबीसी हा वर्ग कुठे आहे? त्यांचे उत्पन्न किती आहे? असा सवाल करीत राहुल गांधी म्हणाले, दलित, मागास, वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय, शिक्षण, न्यायालयासह कुठेही फारशी संधी दिली जात नाही. सरकारी पाठोपाठ खासगी संस्थांमध्ये खासगीकरणामुळे आरक्षण संपवले जात आहे. असे राहुल गांधी म्हणाले.
संविधान अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करावेत – शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराजांनी दिलेले हे आरक्षण पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा हक्क देऊन देशभर लागू केले. मात्र, आज हे संविधान मोडीत काढण्याचे काम सुरु आहे. आपणही देशाचे संविधान अबाधित रहावे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार शाहू महाराज यांनी केले.
नियत चुकीची म्हणून शिवरायांचा पुतळा कोसळला
‘नियत कधी लपू शकत नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला; पण काही महिन्यांतच तो कोसळला. त्यांची नियत चुकीची होती. पुतळ्याने ते संकेत दिले. जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत असाल, तर तुम्हाला त्यांच्या विचारधारेचे रक्षण करावे लागेल. पण त्यांची विचारधारा चुकीची असल्याने तो पुतळा कोसळला. असा हल्लाबोलही राहुल गांधी यांनी भाजपवर केला.