मोदी विकासावर फक्त 8 मिनिटे बोलले…, गर्दीला 4 तास भरउन्हात ताटकळत बसवले

ठाण्यात विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 28 मिनिटांच्या भाषणात विकासकामांवर फक्त आठच मिनिटे बोलले आणि तब्बल 20 मिनिटे ते महाविकास आघाडीवर घसरले. यावेळी मोदींनी चार प्रकल्पांच्या भूमिपूजनाच्या फिती कापल्या. आम्हाला विकास करून देशाला पुढे न्यायचे आहे, पण काँग्रेस आणि त्यांचे सहकारी त्यात अडथळे आणत आहेत, असा आरोपही मोदींनी केला. मोदींच्या या सभेसाठी जमवलेल्या गर्दीला चार तास भरउन्हात ताटकळत बसवल्याने ऑक्टोबर हीटचा तडाखा बसला. गर्दीतील 45 महिला, पुरुषांचा रक्तदाब खालावला आणि चक्कर येऊन ते कोसळले. त्यामुळे सभास्थानी एकच गोंधळ उडाला.

महिला सक्षमीकरण कार्यक्रम आणि विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यासाठी कासारवडवलीच्या बोरिवडे गावातील वालावलकर मैदानावर नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोदी यांनी चार प्रकल्पांच्या भूमिपूजनाची रिमोट कंट्रोलने फीत कापली आणि मेट्रो-3 प्रकल्पाचे लोकार्पण केले. यावेळी मोदी यांनी 28 मिनिटे भाषण केले. 32 हजार कोटींच्या विकासकामांवर सुरुवातीला बोलणाऱ्या मोदींची गाडी अवघ्या आठच मिनिटांत विरोधकांवर घसरली. पुढील 20 मिनिटे ते फक्त काँग्रेस आणि महाविकास आघाडीवरच टीका करत होते.

टीएमटीच्या 250 बसेस सभेसाठी वळवल्या; ठाणे स्टेशनबाहेर बसस्टॉपवर तुफान गर्दी

या सभेसाठी गर्दी जमवण्याकरिता ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर महापालिकेच्या यंत्रणांना जुंपण्यात आले होते. प्रत्येक प्रभाग समितीमधून किमान 20 ते 25 बसेस भरून माणसे आणण्याचे फर्मान सोडले होते. ठाणे परिवहनच्या ताफ्यातील 250 पेक्षा जास्त बसेस गर्दी आणण्यासाठी सभेकडे वळवल्या. त्यामुळे रस्त्यावर केवळ दीडशे बसेसच धावत होत्या. त्याचा मोठा फटका ठाणे स्टेशन परिसरातील बसच्या प्रतीक्षेत असलेल्या नोकरदारांना बसला. त्यामुळे मस्टरवर त्यांचा लेटमार्कचा शिक्का बसला. सभेसाठी आम्हाला वेठीला का धरले, असा संतप्त सवाल नोकरदारांनी केला.

लाडक्या बहिणींना भरउन्हात एक किलोमीटर पायी फरफटत नेले

या सभेसाठी जास्तीत जास्त महिलांना बसमधून आणा अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महापालिकेतील सफाई कामगार, पालिकांच्या महिला कर्मचारी, अधिकारी, बचत गट, वारकरी ग्रुप अशा महिलांना बसमध्ये भरून आणण्यात आले, परंतु त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव एक किलोमीटर आधीच उतरवण्यात आले. डोक्यावर उन्हाचा तडाखा, त्यात नवरात्रीचा उपवास अशा स्थितीत त्यांची सभास्थानी एक किलोमीटर पायी फरफट करण्यात आली. त्यामुळे या लाडक्या बहिणींनीही प्रचंड संताप व्यक्त केला.

45 जण चक्कर येऊन कोसळताच सभास्थानी गोंधळ

मोदींची सभा सायंकाळी साडेचार वाजता सुरू झाली. मात्र दुपारी साडेबारा वाजल्यापासूनच गर्दीला ताटकळत बसवण्यात आले होते. ऑक्टोबर हीटचा तडाखा या गर्दीला बसला. त्यातील 145 जणांना प्रचंड अस्वस्थ वाटू लागले. त्यातील 45 महिला आणि पुरुषांचा रक्तदाब अचानक खालावला. त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर येऊन ते कोसळले. यामुळे सभास्थानी गोंधळ उडाला.

मोदींनी महापालिका मुख्यालयाचे भूमिपूजन केले; रेमंडवासी विरोधात रस्त्यावर उतरले

वर्तकनगरच्या रेमंड वसाहतीत आरक्षित असलेल्या गार्डनच्या भूखंडावर महापालिकेने मुख्यालय उभारण्याचा घाट घातला आहे. या मुख्यालयाचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आले. मात्र या भूमिपूजनाविरोधात संतापलेले रेमंडवासी रस्त्यावर उतरले. आमच्या हक्काचे गार्डन चिरडणाऱ्या महापालिका मुख्यालयाचे भूमिपूजन कसे काय केले जाते, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा उल्लेख नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला, पण या कार्यक्रमात दाखवण्यात आलेली विकासकामांची चित्रफीत संपूर्णपणे हिंदीतून होती.