राज्यातील महत्वाच्या घडामोडी

मुंबईतील 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षकांच्या रखडलेल्या बदल्यांवरून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या गृहविभागाने मुंबई पोलीस दलातील 111 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. अन्य जिह्यांतील 11 पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. दरम्यान, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन अलकनुरे व जितेंद्र आगरकर यांचीही जिल्हा बदली करण्यात आली आहे.

एफडीएच्या आयुक्तपदी राजेश नार्वेकर

तीन आठवड्यापूर्वी माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती मिळालेले सनदी अधिकारी राजेश नार्वेकर यांची बदली आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी नार्वेकर यांच्या नव्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.

म्हाडा घरांसाठी 269 अर्जदार अपात्र

मुंबईतील 2030 घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने अर्जदारांची अंतिम यादी नुकतीच प्रसिद्ध केली. या यादीनुसार, 1 लाख 13 हजार 542 अर्जदार पात्र ठरले असून 269 अर्जदार विविध कारणास्तव अपात्र ठरले आहेत. पात्र अर्जांची संगणकीय सोडत 8 ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरला काढण्यात येणार असून आपल्या घराचे स्वप्न यंदा तरी पूर्ण होणार का, याकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे.

कर्करोगग्रस्त वृद्धाला थकीत भाडे द्या

बिल्डरविरोधात दिवाळखोरीची कारवाई सुरू झाल्यामुळे सात वर्षे ट्रान्झिट भाड्यापासून वंचित कर्करोगग्रस्त वृद्धाला उच्च न्यायालयाने दिलासा दिला. 2013 मध्ये घर रिकामे केलेल्या वृद्धाला सात वर्षांतील थकीत ट्रान्झिट भाड्याचे 2.55 लाख रुपये द्या, असे आदेश न्यायालयाने एसआरएला दिले आहेत. न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने मानवतेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय दिला.

अहमदनगर बनले अहिल्यानगर

अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर पेंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने अहिल्यानगर नामांतराची अधिसूचना जारी केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे करण्यास अनुमती दिल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने 4 ऑक्टोबर रोजी राजपत्र प्रसिद्ध केले. आता महसूल विभागाकडून अहमदनगर तालुका आणि जिह्याच्या नामांतराबाबत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या जातील. यानंतर महसूल विभागाकडून अहमदनगर तालुका व जिह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची अधिसूचना जारी केली जाईल.

भरधाव कारची दुचाकीला धडक

कारने दुचाकीस्वाराला मागून जोरदार धडक दिल्याची घटना गोवंडी येथे शुक्रवारी रात्री घडली. या अपघातात दुचाकीस्वार गोपाळ आरोटे हा तरुण गंभीर जखमी झाला. गोपाळवर झेन इस्पितळात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे याला पोलिसांनी अटक केली.

धारावीत आज वैद्यकीय शिबीर

ओमकार मित्र मंडळ व अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उद्या सकाळी दहा वाजता धारावीतील संत गोरा कुंभार मार्गावरील सुभाषनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये मोफत वैद्यकीय शिबीर आयोजित केले आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मधुमेह, हाडांची, रक्तदाब, स्त्री रोग, रक्त गट तपासणी तसेच ईसीजी एचबी वन सी तपासणी केली जाईल.

पृथ्वी थिएटरमध्ये राग-तालाचा महोत्सव

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या आगामी पिढीतील तरुण आणि प्रतिभावंत कलावंतांचा ‘रागदारी जेननेक्स्ट-परंपरा की नई सोच’ हा कार्यक्रम पृथ्वी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा संगीत जलसा 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत सादर होईल. संगीत जलशाची प्रस्तुती ग्रेस फाऊंडेशनची आहे. यामध्ये गायक सानिया कुलकर्णी, विनय रामदासन, केदार केळकर आणि प्राजक्ता मराठे, श्रुती बुजरबारुआ, अरमान खान तसेच बासरीवादक षडज गोडखिंडी आणि व्हायोलिनवादक यज्ञेश रायकर सहभागी होतील.

आयडीएफसी बँकेमार्फत भरता येणार जीएसटी

आयडीएफसी फर्स्ट बँकेमार्फत आता जीएसटी भरता येणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी हिरवा कंदिल दिला आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक ही जीएसटी संकलनासाठी अधिकृत केलेल्या निवडक शेड्यूल्ड खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक आहे. ग्राहकांना आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या ऑनलाइन आणि शाखा चॅनेलद्वारे त्यांचा जीएसटी सहजतेने भरता येणार आहे.