HIBOX अ‍ॅप घोटाळा प्रकरण, अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दिल्ली पोलिसांनी बजावला समन्स

HIBOX अ‍ॅप घोटाळा प्रकरणी दिल्ली पोलिसांनी बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला समन्स बजावला आहे. रियाला 9 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अ‍ॅपची जाहिरात करून अ‍ॅपमध्ये गुंतवणूक करण्यास लोकांना प्रवृत्त केल्याप्रकरणी रियाला नोटीस बजावण्यात आली आहे.

याआधी पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि यूट्युबर एल्विश यादवसह चार इन्फ्लुएन्सर्सना नोटीस बजावली होती. मात्र यापैकी कुणीही अद्याप चौकशीला हजर राहिले नाही. यामुळे दिल्ली पोलिसांनी एल्विशसह सर्वांना पुन्हा एकदा नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे IFSO युनिट याप्रकरणाचा तपास करत आहे.

काय आहे प्रकरण?

हायबॉक्स अ‍ॅप घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी सिवारामने नोव्हेंबर 2016 मध्ये सवरुल्ला एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली. यानंतर फेब्रुवारी 2014 मध्ये हायबॉक्स अ‍ॅप लाँच केले. या अ‍ॅपच्या माध्यमातून सिवारामने सुमारे 30 हजार नागरिकांची फसवणूक केली. या घोटाळ्यात बॉलीवूड कलाकार आणि हायप्रोफाईल यूट्युबरचा सहभाग असल्याचे कळते.

हायबॉक्स अ‍ॅपला गुंतवणूक योजनेच्या पार्श्वभूमीवर प्रमोट करण्यात आले होते. या अ‍ॅपमध्ये साइन अप करून पैसे गुंतवले जायचे. अ‍ॅपच्या माध्यमातून गुंतवणुकीवर एक ते पाच टक्के परतावा देण्याचा दावा करण्यात आला. शिवाय एका महिन्यात 30 ते 90 टक्के परतावा देण्याचे आश्वासनही या अ‍ॅपद्वारे दिले जायचे. मात्र 2024 मध्ये तांत्रिक समस्या आणि कायदेशीर वैधतेचे कारण सांगून परतावा रोखण्यात आला.

यानंतर दिल्ली पोलिसात हे प्रकरण गेले आणि पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केले. दिल्ली पोलिसांनी आरोपीच्या चार बँक खात्यातील 18 कोटी रुपये जप्त केले. आतापर्यंतच्या तपासात 500 कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे.

या प्रकरणी ॲपची जाहिरात करणाऱ्या बॉलिवूड कलाकार आणि यूट्यूबर्सना नोटीस बजावण्यात आली असून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यामध्ये कॉमेडियन भारती सिंग, यूट्युबर एल्विश यादव, अभिषेक मल्हान आणि लक्ष्य चौधरी यांच्या नावाचाही समावेश आहे.