जागतिकीकरणाच्या काळात कुठेही संघर्ष झाला की प्रत्येक देशाला फटका बसतो असे विधान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले आहे. तसेच मध्य पूर्व असो वा पश्चिम आशिया, संघर्ष झाल्यावर फटका बसतोच असेही जयशंकर म्हणाले.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की मध्य पूर्वेत परिस्थिती खरंच गंभीर आहे. त्याचा परिणाम आपल्या देशावरही होणार आहे. युक्रेन असो वा मध्य पूर्व किंवा पश्चिम आशिया कुठेही संघर्ष झाला की त्याचा फटका प्रत्येक देशाला बसतो. हिंदुस्थानसह प्रत्येक देशाला याची झळ बसते.
मध्य पूर्वेतली परिस्थिती बिघडल्याचे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. या भागात संघर्ष वाढत असून आधी दहशतवादी हल्ले, त्यावर प्रतिहल्ले आणि नंतर जे गाजामध्ये झालं ते अतिशय चिंताजनक असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. लेबनान, इराण विरुद्ध इस्रायल संघर्ष पेटला आहे. दुसरीकडे हुती दहशतवादी लाल समुद्रात गोळीबार करत आहेत. या घटनांमुळे पुरवठा साखळीला धोका निर्माण होतो. जागतिकीकरणाच्या काळात जगात कुठेही संघर्ष झाला की त्याचा फटका संपूर्ण जगाला बसतो. त्यामुळे सगळ्या देशांनी मिळून अशा संघर्षांवर मात करण्यासाठी उपाय केले पाहिजेत.
एसीओ बैठकीसाठी एस जयशंकर पाकिस्तानात जाणार आहेत. त्यावर जयशंकर म्हणाले की, मी हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या द्विपक्षीय बैठकीसाठी पाकिस्तानला नाही चाललोय. हा एक बहुपक्षीय कार्यक्रम आहे. हिंदुस्थान एसीओचा चांगला सदस्य आहे. या बैठकीत हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या संबंधांवर चर्चा होणार नाही असे स्पष्टीकरणही जयशंकर यांनी दिले आहे.