राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. यात तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सचिन कुर्मी हे भायखळ्याचे तालुकाध्यक्ष होते. शुक्रवार रात्री 12 च्या सुमारास त्याच्यावर अज्ञातांकडून हल्ला झाला. भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तालुकाध्यक्ष कुर्मी यांचा मृत्यू झाला. कुर्मी यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सचिन कुर्मी हे जखमी अवस्थेमध्ये पडले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या वाहनातून उपचारासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सचिन कुर्मी यांच्यावर कोणी आणि कोणत्या कारणासाठी हल्ला केला याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. मात्र वादातून कुर्मी यांची हत्त्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. मात्र अद्याप याप्रकरणी कोणतीही अटक झालेली नाही