>> दिलीप ठाकूर
नुकतीच कोलकाता शहराची दीर्घकालीन ओळख असलेली ट्राम बंद करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील ट्राम अनेक वर्षांपूर्वी बंद झाली. पुढे ती चित्रपटात दिसत राहिली. घोडे ओढणारी ट्राम, रुळांवर धावणारी ट्राम, घोडागाडी म्हणजे व्हिक्टोािरिया, फियाट टॅक्सी, मुंबईतील डबलडेकर बस काही वाहने, दूरध्वनी सेवा अशा कालबाह्य झालेल्या गोष्टी जुन्या चित्रपटात पाहायला मिळतात.
आज वयाची पासष्टी सत्तरी ओलांडलेल्या व्यक्तींना ट्राम म्हटल्यावर त्यांच्या बालपणाचे दिवस आठवतील. इंग्रजांच्या काळात ती मुंबई, कोलकाता (पूर्वीचे कलकत्ता) अशा शहरात सुरु झाली. कोलकाता शहरात दीडशे वर्षांपासून सुरु असलेली नि ऐतिहासिक ठेवा म्हणून ओळखली गेलेली ट्राम नुकतीच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोलकाता शहराची ती एक दीर्घकालीन ओळख. मुंबईतील ट्राम 1964 साली बंद झाली. पूर्वी नाना चौक ते माझगाव अशी ट्राम जायची. काही वर्षांनी ते रुळ काढण्यात आले. आजचे मुंबईतील ट्रफिक पाहता त्या रस्त्यावर ट्राम असण्याची कल्पनाही आपण करु शकत नाही.
सुरुवातीस ही ट्राम घोडे ओढत. 1902 साली इलेक्ट्रॉनिक ट्राम आली. वरच्या बाजूतील तारांतून वीज पुरवठा होई. साधारण बससारखाच वाहतूक प्रवास. तीन छोटे डबे आणि गती बरीचशी धीमी. त्या काळातील जीवनशैलीशी मिळती जुळती.
चित्रपटातून सर्वच प्रकारच्या वाहतूकीचे एकाद्या प्रसंगानुरुप ते गाण्यापर्यंत सातत्याने दर्शन घडते. ट्रामचेही घडलंय. दिग्दर्शक सत्यजित राय यांच्या ‘महानगर’ या बंगाली चित्रपटात ट्राम एखाद्या व्यक्तीरेखेनुसार दिसली. हिंदी चित्रपटांत सुजाय घोष दिग्दर्शित कहानी, तिमांशु धुलिया दिग्दर्शित बुलेट राजा, दिवाकर बॅनर्जी दिग्दर्शित ब्योमकेश बक्षी इत्यादी अनेक चित्रपटांत दिसली.
यापुढे मात्र हीच ट्राम (त्याला ट्रामवे म्हणत) फक्त आणि फक्त जुन्या चित्रपटातच दिसणार. बदलत्या काळानुसार मोठय़ा शहरातील अशी अनेक वाहने कालबाह्य झाली आणि इतिहासजमा होत फक्त रुपेरी पडद्यावरच राहिली. मुंबईतील घोडागाडी हीसुध्दा एक उदाहरण. तीदेखील इंग्रजकालीन. तिला व्हिक्टोरिया असेही म्हणत. जुन्या चित्रपटात ती दिसलीय, विशेष म्हणजे दिग्दर्शक ब्रीज यांनी ‘व्हिक्टोरिया नंबर 203’ नावाच्या मनोरंजक चित्रपटात. अशीच एक आणखीन एका वाहनाची गोष्ट म्हणजे फियाट टॅक्सी.
सीने मे जलन आंखो मे तुफान सा क्यू है
इस शहर मे हर शख्मस परेशान सा क्यू है…
मुंबईत 1964 सालापासून म्हणजे तब्बल साठ वर्षं चालणारी फियाट टॅक्सी गतवर्षीच बंद झाली. मुजफ्फर अली दिग्दर्शित ‘गमन’चा (1978) टॅक्सी ड्रायव्हर गुलाम हसन (फारुक शेख) मुंबईत टॅक्सी चालवत असताना बॅकग्राऊंडला शहरयार लिखित व जयदेव यांनी संगीतबद्ध केलेल्या सुरेश वाडकरच्या आवाजातील या गाण्यात मुंबई शहराची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय स्थितीवरचे अंतर्मुख करणारे भाष्य आहे.
टॅक्सी आणि सिनेमा हे नातं दीर्घकालीन. गुरुदत्त दिग्दर्शित ‘आरपार’ (1954), चेतन आनंद दिग्दर्शित ‘टॅक्सी ड्रायव्हर’ आणि जानेमन ( 1976). टॅक्सीमध्ये अनेक गाणी चित्रित झाली. बासू चॅटर्जी दिग्दर्शित रजनीगंधा (1974) कहीं बार यू देखा है, ये जो मन की सीमारेखा है…श्रवणीय. इर्शाद दिग्दर्शित टॅक्सी टॅक्सी (1977) मध्ये अमोल पालेकर टॅक्सी ड्रायव्हर. मुंबईतील पूर्वीच्या डबल डेकर बसचे आपले एक व्यक्तिमत्व होते. आता तीही बंद करण्यात आलीय. चित्रपटांतूनही ही डबल डेकर बस दिसलीय. रमेश सिप्पी दिग्दर्शित शान ( 1980) मधील ‘जानू मेरी जान मै तुझपे कुर्बान’ या गाण्यात. बासू चॅटर्जी यांच्या चित्रपटात बेस्ट बसचा स्टॉप (छोटीसी बात) अथवा डबल डेकर बसचा प्रसंग (बातों बातों मे) असं काही हमखास दिसे. राम महेश्वरी दिग्दर्शित कर्मयोगी चित्रपटात क्लायमॅक्सला डबल डेकर बेस्ट बस आहे.
जुन्या चित्रपटात त्या काळातील काही वाहने, दूरध्वनी सेवा वगैरे अनेक गोष्टी दिसल्या आहेत. आता कालबाह्य झालेल्या गोष्टी जुन्या चित्रपटात पाहायला मिळत राहतील.