>> पराग खोत
नाटक या माध्यमाच्या सर्व मर्यादा नीट लक्षात घेऊन आजच्या फास्ट आणि फॉरवर्ड युगाला साजेशी अशी ही पॅंटसी. मुलांच्या हातात असलेल्या प्रत्येक गॅजेट आणि अॅप्सचा अचूक संदर्भ घेत त्यातली अवास्तवता आणि फोलपणा दाखवण्याचा प्रयत्न करीत एक मनोरंजक सफर घडवणारे हे बालनाटय़… आज्जीबाई जोरात!
शाळेला पडलेली कुठलीही मोठ्ठी सुट्टी म्हणजे बच्चे कंपनीसाठी सगळ्याच गोष्टींची रेलचेल. पिकनिक्स, पार्टीज, नाइटआऊट्स आणि अशाच chill करणाऱया गोष्टी या आजच्या पिढीच्या सुट्टीच्या आयडियाज. गेमिंग आणि ओटीटी म्हणजे डाव्या हाताचा खेळ. कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी आपलीशी करून त्याच्यावर स्वार होणं हे बलस्थान. हॉलीवूडचे मोठमोठे सिनेमे, मल्टिप्लेक्सची मुळातच महाग असलेली तिकिटे काढून पाहायला जाणे आणि तिथे जाऊन ती तिकिटे स्वस्त वाटावीत इतक्या भरमसाट किमतीचे खाद्य पदार्थ विकत घ्यावे हे आजचे स्टाईल स्टेटमेंट. बरं, हल्लीच्या मुलांना आता सिनेमा दाखवायला घेऊन जायला पालकही लागत नाहीत. ती आत्मनिर्भर झालीयत. इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि तिथल्या कॉस्मो कल्चरमुळे त्यांच्या मौजमजेच्या संकल्पना बदलल्या असल्या तर तो त्यांचा दोष नाही. त्यामुळे आजच्या मुलांना बालनाटय़ आणि तेसुद्धा मराठी बालनाटय़ दाखवायला घेऊन जाणं हा एक टास्क आहे. याचाच नेमका विचार करून लेखक, दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन एक नवंकोरं बालनाटय़ घेऊन आलाय, ‘आज्जीबाई जोरात’.
नाटक या माध्यमाच्या सर्व मर्यादा नीट लक्षात घेऊन आजच्या फास्ट आणि फॉरवर्ड युगाला बऱयापैकी साजेशी ही एक फँटसी. म्हटलं तर राजाराणी आणि राक्षसांच्या गोष्टींतून बाहेर पडू पाहणारी आणि म्हटलं तर त्याच गोष्टींमध्ये पुन्हा रमायला लावणारी ही एक मनोरंजक सफर आहे. आज मुलांच्या हातात असलेल्या प्रत्येक
गॅजेट आणि अॅप्सचा अचूक संदर्भ घेऊन त्यांना त्यातली अवास्तवता आणि फोलपणा दाखवण्याचा प्रयत्न करू पाहणारं हे नाटक आहे. फँटसी हा या नाटकाचा मूळ गाभा असल्यामुळे अतार्किक गोष्टींकडून त्यातल्या अपेक्षित संदेशाकडे लक्ष वळविण्यात लेखक यशस्वी ठरला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मॅजिक यांच्या जोडीला असलेल्या शाब्दिक कसरतींमुळे हे नाटक कमालीचं प्रेक्षणीय झालंय. ते छोटय़ांसोबत मोठय़ांनाही गुंगवून, गुंतवून ठेवतं हे विशेष.
क्रीन टाईमच्या आहारी गेलेल्या आजच्या छोटय़ा आणि मोठय़ांबद्दल हे नाटक भाष्य करतं. त्यातून बाहेर पडता येईल अशा शक्यता सुचवतं आणि सोबत भरपूर हसवतं. बालनाटय़ात साधारणत लहान मुलांच्या विनोदांवर त्या विशिष्ट वयातील मुलं खळखळून हसतात, खुर्चीत उडय़ा मारतात आणि त्यांना तसं करताना पाहून त्यांच्याबरोबर आलेली मोठी मंडळी मनातून सुखावतात. मात्र या नाटकात छोटय़ांबरोबर मोठेही त्या विनोदाचा मनसोक्त आस्वाद घेतात, दाद देतात, त्याचाच एक भाग होतात आणि हेच या नाटकाचं वेगळेपण म्हणता येईल. नाटकातला विनोद प्रगल्भ आहे आणि तो सगळ्यांनाच हसवतो. तो बालिश नाही, तर बालसुलभ आहे आणि स्वतचा एक विशिष्ट दर्जा राखून आहे. मनोरंजक कोडी, करामती आणि शाब्दिक गमती जमतींची योग्य ती सरमिसळ करत एक भन्नाट रोलरकोस्टर आपल्यासमोर सादर होतो.
या नाटकाची गोष्ट आपल्या प्रत्येकाच्याच घरात घडणारी. उच्च मध्यमवर्गीय सुखवस्तू घरातली. नोकरीसाठी परदेशात असलेला बाबा, घर आणि एकंदरीतच सगळं काही सांभाळणारी आई, त्यांचा एकुलता एक स्मार्ट मुलगा आणि या सगळ्यांच्याच आयुष्यात असलेलं, पण न दिसलेलं रितेपण या नाटकात दिसतं. पण त्याला दर्जेदार विनोदाची अशी काही जबरदस्त फोडणी दिलीय की, त्यातली सगळी दुःख विरघळून, प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा एक खमंगपणा दिसतो. या नाटकाच्या शीर्षकात असलेली आज्जी ही नाटकाची सूत्रधार असल्याने ती या कुटुंबाचा भाग नाही. पालकांचा त्रागा, मुलांची घुसमट, शिक्षकांची हतबलता आणि मराठी भाषेविषयीची अनास्था या सगळ्याचे दर्शन घडविणारा आणि त्यावर उत्तरे सुचवू पाहणारा हा प्रयोग आहे. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन तो प्रेक्षणीय करण्याचा प्रयत्न केला आहे, पण हे करताना त्यातलं नाटय़ कुठेही हरवणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलीय. बालनाटय़ असल्याने यात फार टोकाचा संघर्ष नाही आणि पडलेल्या प्रश्नांची उत्तरे पटापट मिळत जातात ही गोष्ट आपण समजून घेतली की, ते खटकत नाही.
लेखक, दिग्दर्शक क्षितिज पटवर्धनने हे नाटक चालतं, बोलतं आणि हसतं, खेळतं ठेवलंय. यातली समस्या ढोबळ असली तरी ती मांडताना दाखवलेले तपशील आणि घेतलेल्या जागा उल्लेखनीय आहेत. आजच्या पिढीतल्या तंत्रज्ञानात पारंगत असलेल्या लहानग्यांना आपल्याशा वाटतील अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव यात केलाय. त्याला त्याच्या टेक्निकल टीम आणि बॅकस्टेज आर्टिस्टनी भक्कम पाठिंबा दिल्याचे नाटक बघताना जाणवते. या नाटकात समाविष्ट केलेल्या मॅजिक अॅक्ट्सना स्प्रुसिद्ध मॅजिशियन आणि मेन्टालिस्ट सुहानी शाह हिचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रमुख कलावंतांच्या जोडीला स्टेजवर वावरणाऱया तरुण, उत्साही कलावंतांची एक फौजच या नाटकात आहे. हे सगळेच धमाल उडवून देतात. सध्या अवगत असलेली वेगवेगळी टेक्निकल गिमिक्स वापरून हे नाटक अत्याधुनिक केलंय.
आता हे नाटक एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणाऱया त्यातल्या कलावंतांविषयी. मुलांची करमणूक करणाऱया या बालनाटय़ात एकही बालकलाकार नाही, किंबहुना मोठय़ांनी छोटय़ांसाठी केलेले नाटक असे याचे वर्णन करता येईल. निर्मिती सावंत सूत्रधाराच्या मध्यवर्ती भूमिकेत आहेत आणि त्यांना मुग्धा गोडबोले, पुष्कर श्रोत्री आणि जयवंत वाडकर यांनी साथ दिलीय. निर्मितीताईंची सहजता आणि त्यांची प्रेक्षकप्रियता इथे उपयोगी पडते. पुष्कर श्रोत्रीने त्याचा ठसका दाखवून दिलाय. या नाटकाचा खरा नायक आहे रंगभूमीवर पदार्पण करणारा अभिनय बेर्डे. आधी सिनेमा आणि नंतर नाटक असा उलट प्रवास करणाऱया या गुणी नटाने नाटक अक्षरश तोलून धरलंय. त्याची अफलातून ऊर्जा आणि रंगभूमीवरचा वावर आश्वासक आहे. विद्यार्थ्याचे बेअरिंग सांभाळताना या तरुणाने कमाल केलीय. गोंडस, गुबगुबीत शाळकरी मुलगा साकार करतानाच्या त्याच्या हालचाली बघताना आपली दमछाक होईल इतक्या वेगवान आहेत. दिग्दर्शकाने त्याला बांधून दिलेल्या जागा त्याने अगदी चोख घेत हशे आणि टाळ्या वसूल केल्या आहेत. लहान मुलाचा हवाहवासा वाटणारा आगाऊपणा त्याने छान दाखवलाय. नाटकात एकदाच येणाऱया एका वाक्याच्या उच्चारात तो त्याच्या बाबाची आठवण करून देतो.
दिग्दर्शक आणि सहाय्यक दिग्दर्शक यांनी नाटक बसवताना अफाट मेहनत घेतल्याचे जाणवते. सर्वच कलाकारांकडून कसून सराव करून घेताना उत्तम समन्वय साधल्यामुळे एक बंदिस्त परिणाम जाणवतो. प्रत्येक अॅक्शन घोटवून घेतली आहे. जादूचे सिक्वेन्स एकदम flawless. अनेक छोटय़ा छोटय़ा जागी लेखक आणि दिग्दर्शकाचा प्रभाव जाणवत असला तरी खास उल्लेख करावा अशी पुष्कर श्रोत्रीची एंट्री आणि दुसरा अंक सुरू होतानाची अनपेक्षित फॉर्मेशन्स धमाल उडवून देतात. तसेच नाटय़गृहाच्या भिंतीवर प्रोजेक्शनचा केलेला प्रयोग कौतुकास्पद. गीत, संगीत, नृत्ये, रंगभूषा आणि वेशभूषा सर्वच उल्लेखनीय असले तरीही पार्श्वसंगीताचा उल्लेख करणे उचित ठरेल. त्यासाठी सौरभ भालेरावला शाबासकी द्यायलाच हवी. नेपथ्य आणि त्याचा आवश्यक तो वापर परिणामकारक करण्यात प्रदीप मुळ्येंनी बाजी मारलीय. एकंदरीत या बालनाटय़ाची भट्टी अगदी जमून आलीय. लहानांपासून मोठय़ांना हसविणारा आणि त्यांच्याशी थेट संवाद साधणारा हा नाटय़ प्रयोग आहे.
आता या नाटकातल्या काही त्रुटींवर एक कटाक्ष. या नाटकातल्या समस्येशी निगडित असलेली मराठी माध्यमांच्या शाळांची गळचेपी ही आपल्याच स्टेटस प्रेमामुळे ओढवलेली आहे. तसेच लहान मुलांच्या हातात आपणच आपल्याला मोकळा वेळ मिळावा म्हणून मोबाइल दिले आहेत. आता आपणच त्या समस्येवर बोट ठेवतो आहोत. त्यात मुलांचा काहीच दोष नाही, असलाच तर पालकांचा आहे. दुसरं म्हणजे यात जी quick fix solutions सुचवली आहेत ती वरवरची आहेत. मानसशास्त्राrय आणि सामाजिक कसोटय़ांवर ती घासून घेतलेली नाहीत. तसेच AI आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर अजून परिणामकारक करता आला असता असे वाटते.
सुरुवातीच्या निवेदनात AI च्या सहाय्याने निर्माण केलेला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आवाज अधिक अचूक हवा होता. नेपथ्यात सतत होणारे बदल कमी करता येऊ शकले असते असे वाटते. हे धाडसी आणि खर्चिक बालनाटय़ प्रेक्षकांसाठी घेऊन आल्याबद्दल या नाटकाचे निर्माते दिलीप जाधव, चंद्रकांत कुलकर्णी आणि श्रीपाद पद्माकर यांचे विशेष कौतुक. बालनाटय़ फक्त शाळांच्या सुट्टीत बघायची असतात हा समज दूर करून वर्षभर याचे प्रयोग होतील आणि छोटय़ांसोबतच मोठेही आवर्जून त्या प्रयोगाला येतील याची खात्री आहे. इतका जिव्हाळ्याचा विषय योग्य वेळी समोर आल्यामुळे त्यातली समस्या सोडविण्याच्या दृष्टीने निश्चितच पावले उचलली जातील. मनोरंजनाबरोबर प्रबोधन करणारे हे महाबालनाटय़ तुम्ही बच्चे कंपनीबरोबर अवश्य बघा आणि त्यांच्या सोबत पुन्हा एकदा लहान होऊन जगा. खरं तर आपल्या मोठय़ांनाच त्याची जास्त गरज आहे हे विदारक सत्य मांडणारे हे नाटक न चुकता बघायलाच हवे.