सत्याचा शोध- धर्मग्रंथातील अधर्म!

>> चंद्रसेन टिळेकर

जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्त्री ला मानाचे स्थान कसे मिळेल आणि ते मिळाल्यावर अबाधित कसे राहील, याची दक्षता पुरुष वर्गाने घ्यावयाची आहे. स्त्री चा हात जिथे फिरतो तिथे लक्ष्मी अवतरते ही भाबडी उक्ती नसून सर्वकालीन सत्य असल्याने ‘न स्त्राr स्वातंत्र्यम् अर्हती’ असा विपरीत उपदेश करणाऱया तथाकथित धर्मग्रंथापासून दूर राहणेच चांगले.

आपल्यापेक्षा दुर्बल सजीवांवर कुरघोडी करून आपली तुंबडी भरणे हा सजीवांचा एक गुणधर्मच मानला जातो. मोठा मासा छोटय़ा माशाला खातो हे तर आपण लहानपणापासून ऐकतच आलेले आहोत. ‘बळी तो कान पिळी’ हे वचनही येता जाता आपल्या कानावर पडलेले असते. एखाद्याचे संस्कृत कच्चे असले तरी त्याला ‘जीवो जिवस्य जीवनम्’ या संस्कृत वचनाची प्रचीती केव्हा ना केव्हा आलेलीच असते.

हे वचन सर्व प्राणीमात्राला लागू असल्याने मनुष्य जातीलाही लागू आहे हे ओघाने आलेच, कारण मानव हाही एक प्राणीच आहे हे कोणी नाकारणार नाही. या मनुष्य जातीतही पुन्हा दोन जाती, त्या म्हणजे एक पुरुष आणि दुसरी स्त्री! या दोन जातीत स्त्री ही शारीरिकदृष्टय़ा दुर्बल असल्याने तिच्यावर कुरघोडी करण्याचा, तिचे सर्व दृष्टय़ा शोषण करण्याचा मक्ता पुरुषाला मिळाल्यासारखा झाला आणि त्याचा त्याने भरपूर फायदा घेतला. खरे तर मानवी उक्रांतीत हे सहज घडून आलेले नाही. या आधीच्या काही लेखात नमूद केल्याप्रमाणे स्त्री ही आपल्यापेक्षा चतुरस्त्र आहे हे त्याच्या लक्षात आले होते. विशेषतः संततीची निर्मिती केवळ एकटय़ा स्त्री मुळेच होते अशी त्याची धारणा होती. परंतु शेतीचा शोध लागल्यावर आपल्याशिवाय स्त्री ला संतती निर्माण करता येणे अशक्य आहे याचा साक्षात्कार त्याला झाला आणि इथेच स्त्री – पुरुष विषमतेची ठिणगी पडले. असे असले तरी तिच्या श्रेष्ठत्वाची भीती अधूनमधून त्याला भेडसावयाचीच.

कालांतराने विश्वाच्या विविध भागांत वसती करून राहिलेल्या मानव समूहाला नीती-नियमाची गरज भासू लागली. हे कार्य पुरुष वर्गाने मोठय़ा चातुर्याने आपल्या अंगावर घेतले आणि या प्रक्रियेतून निर्माण झाला तो धर्म! जगातल्या पुरुषांच्या दृष्टीने ही मोठी पर्वणी होती, कारण त्यांना पुरुषांचे वर्चस्व राहील असा मापदंड निर्माण करण्याची सुवर्णसंधी मिळाली. म्हणूनच जगातल्या यच्चयावत धर्मग्रंथात पुरुषाला झुकते माप देऊन स्त्री ला दुय्यम दर्जाची मानलेली दिसते.

धर्माची निर्मिती जरी पुरुषाने केली असली तरी त्याचे म्हणजे त्यातील वचनांचे – अधिक काटेकोरपणे बोलायचे तर धर्माज्ञांचे पालन करण्याची जबाबदारी मात्र त्याने स्त्राrवर टाकली. त्यासाठी त्याने अनेक कर्मकांडे निर्माण केली, की जेणेकरून स्त्री अधिकतर त्याच्यातच गुंतून पडेल आणि पुरुषाला हवे ते करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल. तेव्हा जगभरातल्या स्त्री च्या दैनावस्थेला पुरुषांनी निर्माण केलेले हे धर्मच कारणीभूत आहेत. परंतु दुर्दैवाने स्त्राrच्या हे गावी नसावे याची मोठी खंत वाटते. अन्यथा भररस्त्यावर चाळीस-पन्नास हजार स्त्रिया उन्हातान्हात अथर्वशीर्ष म्हणत बसल्या नसत्या.

भारतीय संस्कृती ही जगामध्ये ज्या हातावरच्या बोटावर मोजता येतील अशा प्राचीन संस्कृती उदयाला आल्या त्यापैकी एक संस्कृती आहे हे निर्विवाद! त्यामुळे आपले धर्मग्रंथही तितकेच प्राचीन असणार हेही ओघाने आलेच. परंतु आमचे हे ग्रंथ प्राचीन ऋषी मुनींनी लिहिलेले असले तरी तेही पुरुषच होते याचे विस्मरण भारतीय स्त्री ने होऊ देऊ नये. साहजिकच आपल्याही धर्मग्रंथात स्त्राrला दुय्यमच स्थान दिले आहे. नुसते दुय्यम स्थानच नव्हे तर मनुस्मृति, गुरुचरित्र इत्यादी ग्रंथातून स्त्री ची यथेच्छ निंदा केली आहे. गुरुचरित्रात तर सतीच्या चालीची भलावण केलेली दिसते. उत्तर हिंदुस्थानात ज्याची आवडीने पारायणे केली जातात त्या रामचरितमानसमध्ये तर ‘ढोल, गवार, शूद्र, पशु, नारी सकल ताडन के अधिकारी’ असा जणू पुरुष जातीला सावधगिरीचा हितोपदेश केला आहे. अशा पार्श्वभूमीवर स्त्री त्वाचा सन्मान व्हावा तरी कसा? मग भले आचार्य अत्रे म्हणोत की, ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आहे, परंतु अनंत काळची माता आहे.’ किंवा कविवर्य यशवंत म्हणोत, ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी!’

ते खरे असले आणि आधुनिक समाजाने स्वीकारलेले असले तरी निसर्गाने आणि परिस्थितीनेही पुरुषांना कितीही स्वच्छंदी भ्रमरवृत्ती बहाल केली असली तरी उमलत्या कळ्यांवर आपल्या वासनापूर्तीसाठी त्याने झडप घालावी हे कोडे मात्र सुटत नाही. कारण या उमलत्या कळ्याच उद्याच्या माता आहेत, माऊली आहेत! म्हणूनच नवीन लग्न झालेल्या गर्भार मुलीकडे पाहून कवीवर्य बा. सी. मर्ढेकर म्हणतात,

पोरसवदा होतीस काल परवा पावेतो!
थांब उद्याचे माऊली तीर्थ पायाची घेईतो!!

मर्ढेकरांनी व्यक्त केलेली ही उदात्त भावना पुरुषवर्गाने शिरोधार्य मानली तर किती बहार होईल.स्त्री वरील अत्याचार कमी व्हावेत म्हणून पुरुषप्रधान संस्कृतीऐवजी स्त्री प्रधान संस्कृती अमलात आणावी हा एक उपाय असू शकतो. परंतु आता तो एक कल्पनाविलासच होऊ शकतो हे कोणीही मान्य करील. तेव्हा आपणच आता काही पावले उचलणे भाग आहे.

सुरुवात अर्थातच शालेय जीवनापासूनच करावी लागेल. अभ्यासाच्या धडय़ाबरोबरच स्त्री-सन्मानाची शिकवणही देण्यात गुरुजनांचे मोठे योगदान राहणार आहे. करमणुकीच्या क्षेत्रात अनेकदा स्त्राrच्या संदर्भात थिल्लरपणा दिसून येतो. त्याला आळा घालणेही क्रमप्राप्त ठरणार आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्त्री ला मानाचे स्थान कसे मिळेल आणि ते मिळाल्यावर अबाधित कसे राहील, याची दक्षता पुरुष वर्गाने घ्यावयाची आहे यात काही शंका नाही. स्त्री चा हात जिथे फिरतो तिथे लक्ष्मी अवतरते ही भाबडी उक्ती नसून सर्वकालीन सत्य असल्याने ‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हती’ असा विपरीत उपदेश करणाऱया तथाकथित धर्मग्रंथापासून दूर राहणेच चांगले. धर्मग्रंथातील वचनांवर शंका घेणे हे अधर्मी लक्षण मानले गेले असले तरी स्वा. सावरकर मात्र धर्मग्रंथांबद्दल आपल्याला त्यांच्या ‘क्ष किरणे’ या ग्रंथात स्पष्टपणे बजावतात की, ‘आमचे सारे धर्मग्रंथ आम्ही विज्ञानाच्या कसोटीवर घासून पाहणार आणि त्या कसोटीवर जे टिकतील त्यांचाच स्वीकार करणार आणि कालबाह्य झालेल्या धर्मग्रंथांना अखेरचे वंदन करून माळ्यावर ठेवणार!’ यापेक्षा अधिक ते काय बोलावे?

[email protected]