गुंगीचे औषध पाजून काढलेले आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या बिल्डर पुत्राची हत्या केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. पीडितेच्या मित्रानेच हा काटा काढला आहे. कोयत्याने एकापाठोपाठ 50 वार करून ही हत्या केली आहे. स्वयम परांजपे (33) असे मृत बिल्डर पुत्राचे नाव आहे. याप्रकरणी कोपरी पोलिसांनी मयुरेश धुमाळला ताब्यात घेतले आहे.
स्वयम परांजपे हा 28 एप्रिल रोजी एका लग्नसमारंभात गेला असताना त्याची 20 वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली. त्यावेळी स्वयमने तिला कारने घरी सोडतो असे सांगत सोबत घेऊन निघाला. मात्र वाटेत असताना त्याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून स्वतःच्या घरी घेऊन गेला. तिथे स्वयमने मोबाईलमध्ये तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढले. काही दिवसांनी त्याने तरुणीला काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत भेटण्यासाठी तगादा लावला. ही बाब कळताच संतापलेल्या मयुरेशने स्वयमची हत्या केली. मयुरेशने हत्या का केली याचा सखोल तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत शिंदे यांनी सांगितले.