Mumbai: ‘तडजोड’ करशील तर मोठं पद मिळवून देईन… MSRTC अधिकाऱ्यावर महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप

man-try-to-touch-lady

 

महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) उच्चपदस्थ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेकडून शारीरिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.

एमएसआरटीसी प्रकल्पांसाठी खासगी सल्लागाराकडे काम करणाऱ्या महिलेने 1 ऑक्टोबर रोजी नागपाडा पोलिसात तक्रार दाखल केली. इंडिया टुडे टीव्हीने हे वृत्त प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या हाती लागलेल्या एफआयआरनुसार, महिलेने सांगितले आहे की ही घटना मे महिन्यात घडली. आरोपी अधिकाऱ्याने मुंबई सेंट्रल कार्यालयात त्याच्या केबिनमध्ये संबंधित महिलेला बोलवले. बैठकी संपल्यावर इतर लोक बाहेर गेल्यानंतर अधिकाऱ्याने तिला त्याच्या केबिनमध्येच थांबण्यास सांगितले.

त्यानंतर त्याने तिला ई-मेल लिहायला सांगितले आणि प्रसाधनगृहात जाऊन आला. परत आल्यानंतर तो अगदी झुकून महिलेच्या जवळ जाण्याचा सारखा प्रयत्न करत होता.

एफआयआरमध्ये असे नमूद केले आहे की अधिकाऱ्याने महिलेला सांगितले की, तिच्या कंपनीतील तिची वरिष्ठ पुढे जाऊ शकली कारण तिने ‘तडजोड’ केली आणि तिलाही तशी ग्रोथ करायची असल्यास तिनेही तशी तडजोड करावी. तिला त्याने आश्वासन दिले की जर ती ‘तडजोड’ करण्यास सहमत असेल तर तो तिला व्यवस्थापक म्हणून पदोन्नती देण्यासाठी तिच्या वरिष्ठांना शिफारस करू शकतो.

अधिकाऱ्याने तिला वचन दिले की सहा महिन्यांच्या आत, दुसऱ्या कन्सल्टन्सी फर्मसोबत एक नवीन प्रकल्प असेल आणि जर तिने त्याचा प्रस्ताव स्वीकारला तर तो तिला तिथे सहयोगी संचालक म्हणून नियुक्त करू शकेल.

अधिकाऱ्याने तिला सांगितले की, त्याने त्याच्या पत्नीवर शस्त्रक्रिया केली असल्याने त्याने सहा वर्षांपासून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीत. त्याने असेही सांगितले की तो एका हॉटेलमध्ये एक खोली बुक करेल आणि ती त्याची “friend with benefits” बनून राहिल का असे विचारल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे.

त्यानंतर महिला केबिनमधून तडक बाहेर पडली. अधिकाऱ्याने त्याच संध्याकाळी तिला पुन्हा फोन केला आणि विचारले की ती ‘तडजोड’ करण्यास तयार आहे का. महिलेने नकार दिला आणि कॉल रेकॉर्ड करून ठेवला. त्यानंतर तिने तिच्या वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली आणि तिची तक्रार POSH (लैंगिक छळ प्रतिबंधक) समितीकडे पाठवण्यात आली. एमएसआरटीसीलाही माहिती देण्यात आली आणि अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही काळानंतर अंतर्गत समिती सदस्य बदलण्यात आले आणि काही नातेवाईक आणि आरोपी अधिकाऱ्याच्या ओळखीच्या लोकांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

अखेर महिलेने 1 ऑक्टोबर रोजी पोलिसात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की ते साक्षीदार आणि आरोपींचे जबाब नोंदवतील.

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना एमएसआरटीसीचे उपाध्यक्ष आणि प्रशासकीय संचालक माधव कुसेकर म्हणाले, ‘मी अंतर्गत समितीकडून अहवाल मागवला असून तो लवकरच सादर केला जाईल. आज समितीच्या अध्यक्षांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आल्याने आमच्याकडे अहवाल सादर करता आला नाही, ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि अहवाल सादर होताच, आम्ही समितीच्या निष्कर्षांनुसार योग्य ती कारवाई करू’.

या समितीत आरोपी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची नियुक्ती झाल्याच्या आरोपाबाबत कुसेकर म्हणाले, समितीमध्ये असे कोणाचेही नातेवाईक नाहीत.