अजून जागा ताब्यात नाही तरी महापालिका मुख्यालयाच्या भूमिपूजनाचा घाट कशासाठी?

कॅडबरी जंक्शन येथील रेमंड कंपनीच्या जागेत असलेल्या आरक्षित भूखंडावर महापालिकेचे नवीन मुख्यालय उभारण्याचा घाट घातला आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन अजून ताब्यात आलेली नाही. तसेच विकास आराखड्यानुसार जागा राखीव करण्याची प्रक्रियादेखील पूर्ण झालेली नाही. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहीत आहे का? असे असताना महापालिका भूमिपूजनाची घाई कशासाठी, असा सवाल ठाणे काँग्रेसने केला आहे.

ठाणे महापालिकेच्या 2022 मधील महासभेमध्ये रेमंड कंपनीला मिळणाऱ्या एकत्रितअॅमिनिटीमध्ये महापालिका भवन, ओपन पार्किंग टर्मिनल व खेळाचे मैदान बांधण्याबाबत ठराव मंजूर आहे. . तरीसुद्धा स्वतःचा भूखंड सोडून आरक्षित केलेल्या अन्य भूखंडावर पालिका मुख्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेचे अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली असून नियमाच्या विरुद्ध काम सुरू असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. तसेच निविदा प्रक्रिया राबवण्यापूर्वी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे याबाबत सूचना करणे आवश्यक असताना त्यांनी याकडे पूर्णपणे डोळेझाक करून निविदा प्रसिद्ध करण्याची घाई करण्यात येत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे उपस्थित होते.