नार्वेकरांच्या बेकायदा बंगल्याची फाईल तीन वर्षे कोणी दाबली?

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा भाऊ मकरंद नार्वेकर व जवळपास अन्य 12 जणांनी अलिबागच्या मापगाव ग्रामपंचायत हद्दीत बेकायदा बंगले बांधतानाच हजारो ब्रास मातीचा भराव करून रस्तेदेखील केले आहेत. याबाबत झिराड मंडळ अधिकाऱ्यांनी कारवाईचा अहवाल तयार करून तहसीलदारांना पाठवला आहे. मात्र राजकीय दबावामुळे तीन वर्षे उलटली तरी कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला नाही. त्यामुळे बेकायदा बंगल्यांची ही फाईल नेमकी कोणाच्या इशाऱ्यावरून दाबली, असा सवाल करतानाच गावकऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घोटाळ्याचे भांडे फुटल्याने ‘मिंधे’ झालेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मकरंद नार्वेकर, निकिता संघवी, समीर संघवी, पंखुरी डालमिया, हर्ष डालमिया, चंद्रेश अंबानी, सुवर्णा अंबानी, जतीन संघवी, फाल्गुनी संघवी, ममता पानथुला, शीतल अग्रवाल, सुरुची युसूफ यांच्या नावे अलिबाग तालुक्यातील मुनवली-मुशेत येथे जमीन आहे. मात्र सर्वांनी या जागेचा विकास करताना सर्रासपणे नियम धाब्यावर बसवल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांवर दबाव टाकून मकरंद नार्वेकर यांनी हजारो ब्रास भराव टाकून रस्ते तयार केले आहेत. तसेच नार्वेकर व त्यांच्या अन्य तीन सहकाऱ्यांनी चार बेकायदा बंगलेदेखील बांधले आहेत. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. दरम्यान भराव करताना पावसाचे पाणी वाहून नेणारे मार्गही बंद केल्याने जाधवपाडा, लोहारपाडा, भंडारपाडा गावात पावसाळ्यात पाणी साचत असून शेतीचेदेखील नुकसान होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा करत कारवाईचा अहवाल अलिबाग तहसीलदारांना सादर केला आहे.

होम थिएटर, स्वीमिंग पूलसह बरेच काही

मुनवली येथे ४ बंगल्याचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले आहे. 26 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार पहिल्या बंगल्याचे बांधकाम करताना हॉल, 6 रूम, दंडागोलाकृती रूम, स्वीमिंग पूल, स्वीमिंग पूल चेंजिंग रूम, होम थिएटर असे अलिशान बांधकाम करण्यात आले आहे. तर दुसरे अपूर्ण बांधकाम असल्याचा पंचनाम्यात उल्लेख आहे. तिसरे बांधकाम 225 चौरस मीटरचे आर.सी.सी. करण्यात आले आहे. चौथ्या बांधकामात आर.सी.सी.चे तीन जोते बांधण्यात आल्याचे पंचनाम्यात उल्लेख आहे.