विशेष – नवरात्रीचा गर्भितार्थ

>> विद्याधरशास्त्री करंदीकर

शरद ऋतूमध्ये येणाऱ्या शारदीय नवरात्रात अनेक ठिकाणी घटस्थापना केली जाते. या घटाभोवतीच्या मातीमध्ये सप्तधान्ये पेरली जातात. या बीजांमधून नऊ दिवसांत फुटलेल्या अंकुरामागे नवनिर्मिती ही संकल्पना आहे. सृष्टीमध्ये स्त्रीशिवाय कुठलीही प्रजाती नवनिर्मिती करू शकत नाही. त्यामुळेच संपूर्ण सृष्टीमध्ये स्त्री शक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच नवरात्रात स्त्री शक्तीची पूजा केली जाते.

आपल्याकडे बहुतेक जणांना वाटते की, आश्विन महिन्यात येते तीच एक नवरात्र आहे, पण वास्तवात तसे नाही. ऋतुमानामध्ये जेव्हा जेव्हा बदल होतो तेव्हा तेव्हा साधारणपणे नवरात्र येत असते. त्यापैकी आश्विन महिन्यातील नवरात्र सर्वांना अधिक माहिती आहे. त्याला शारदीय नवरात्र म्हणतात. मराठी वर्षाची सुरुवात चैत्रातील गुढीपाडव्यापासून होते, तिथेही नवरात्रारंभ असतो. त्याला वासंतिक नवरात्र असे म्हणतात. म्हणजे वसंत ऋतूतील नवरात्र आणि शरद ऋतूतील नवरात्र या दोन प्रमुख नवरात्र आहेत, पण या दोन्हींच्या मध्येही शाकंभरी नवरात्र, राम नवरात्र, दत्त नवरात्र अशा निरनिराळय़ा नवरात्री येत असतात. लोकांचा असा समज आहे की, नवरात्र म्हटले म्हणजे नऊ रात्री त्यामध्ये आल्या पाहिजेत. पण शास्त्रकारांनी तसे काही सांगितलेले नाही. शास्त्रकार सांगतात की, प्रतिप्रदेपासून नवमीपर्यंत हा जो कालखंड आहे, त्याला नवरात्र म्हणायचे. काही वेळेला त्यामध्ये आठ दिवस येतात, तर काही वेळेला दहा दिवस येतात.

प्रत्येक नवरात्राचे महत्त्व वेगळे असते. तसे शारदीय नवरात्रीचे महत्त्वदेखील वेगळे आहे. आपल्याकडे आशीर्वाद देण्याची पद्धत आहे. एखाद्याला दीर्घायुष्याचा आशीर्वाद देताना ‘जीवेत् शरद शतम्’ असे म्हणतो. वेदांमधला हा आशीर्वाद असून त्यात त्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही शंभर वर्षे जगा आणि शंभर वर्षे शरद ऋतू बघा. ऋतू जेव्हा बदलतात तेव्हा वातावरण बदलते. शरद ऋतूमध्ये अनारोग्य वाढण्याची किंवा मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अनारोग्यावर अथवा मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी नऊ दिवस व्रतस्थ राहण्यास सांगितले आहे. यामध्ये काही लोक नऊ दिवस उपवास करतात. काही जण एकच पदार्थ खातात. प्रत्येकाची परंपरा वेगळी असू शकते. मात्र या सगळ्या गोष्टींचा आपल्या आरोग्याशी फार जवळचा संबंध आहे.

नवरात्रात आदिशक्तीची पूजा केली जाते यामागचा धार्मिकदृष्टय़ा विचार केला तर राक्षसांबरोबर या काळात देवीचे युद्ध सुरू असते. हा एक योगमार्गातील तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातील भाग आहे. पौराणिक कथांच्या आधारे विचार करायचा झाल्यास देवी सतत आपल्यावर प्रहार करणाऱया, मानवजातीला किंवा निसर्गाला त्रास देणाऱया ज्या प्रवृत्ती आहेत, त्या प्रत्येक प्रवृत्तीचा नायनाट करून ही सृष्टी सुजलाम-सुफलाम व्हावी, सज्जन लोकांना सहकार्य व्हावे यासाठी या राक्षसांशी युद्ध करत असते. ते युद्ध करत असताना मी देवीला काहीतरी सहाय्य केले पाहिजे या हेतूने देवीची उपासना, सेवा करण्याची प्रथा याला सुरूवात झाली.

देवीच्या उपासनेत सप्तशती हा प्रमुख ग्रंथ आहे. अनेक ठिकाणी या दिवसांत सप्तशतीचे पाठ वाचले जातात. देवीची ही सेवा केल्यामुळे देवीला बळ मिळते आणि राक्षसांचा नाश लवकर केला जाऊन तिचा शीण याद्वारे थोडा कमी केला जातो, अशी यामागची भावना आहे.

आपल्याकडे नवरात्रीच्या या नऊ दिवसांत घराघरांत घट बसवण्याची परंपराही पाहायला मिळते. यामध्ये जमिनीवर मातीचा एक चौथरा तयार केला जातो. त्यावर एक कलश ठेवला जातो. त्यामध्ये निरनिराळ्या ठिकाणचे पाणी घातले जाते. सप्तनद्यांचे पाणी घालणे शक्य नसल्यास इतर नद्यांचा नामोच्चार करून मंत्राने निरनिराळ्या नद्यांच्या पाण्याची निर्मिती करता येते. नवरात्राच्या कलशातील पाणी मंत्र आणि नामोच्चाराद्वारे अभिमंत्रित करून त्यावर एक ताम्हण ठेवून त्या ताम्हणात देवीची स्थापना केली जाते. खालील मातीवर सप्तधान्य पेरले जाते. हा कलश मातीचा असावा अशी पूर्वपरंपरा आहे. कारण या कलशातून आतील पाणी झिरपत मातीपर्यंत पोहोचते आणि नऊ-दहा दिवसांत पेरलेल्या सप्तधान्यांतील कोंब फुटून बाहेर येतात. म्हणजे ही नवनिर्मितीची एक प्रक्रिया आहे. नवरात्राच्या नऊ दिवसांत पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या नऊ देवी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये ‘प्रथमम् शैलपुत्रीच, द्वितीयम ब्रह्मचारिणी, तृतीयम् चंद्रघंटेची, कुष्मांडा ती चतुर्थकम्’ अशा प्रकारे नऊ देवींची वर्णने केलेली आहेत.

योगमार्गाचा विचार करत असताना मानवी शरीरामध्ये कुंडलिनी नावाची शक्ती आहे. ती शक्ती जागृत होण्यासाठी या शक्तीची उपासना केली जाते. थोडक्यात, माझे जे शरीर आहे ते शुद्ध करून त्या शरीराची पुनर्निर्मिती करणे म्हणजे आतल्या पेशींची पुनर्निर्मिती करणे. हा सगळा प्रक्रियेचा भाग या नऊ दिवसांत मानवाने आपल्या उपकर्मात ठेवावा लागतो. ती प्रक्रिया करण्यासाठी आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवणे, आपल्या शरीरशुद्धीतून आपल्या योगमार्गाने रोज निरनिराळ्या देवींची पूजा करून आपला प्राण कुठे असला पाहिजे हे बघितले जाते. नऊ दिवसांतली प्रत्येक देवी दिसायला कशी आहे कुठे आहे याचे वर्णन केले आहे. मग योगमार्गाने माझा जो कुंडलिनीचा प्रवास आहे, प्रत्येक दिवशी त्याचा अभ्यास करून करून शेवटी तो सहस्त्रदल कमलापर्यंत कसा न्यायचा आणि त्यानंतर आपल्या शरीराची पुनर्निर्मिती कशी करायची हासुद्धा योगमार्गाने नवरात्राचा स्वतंत्र अर्थ सांगता येतो.

नवरात्राचा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा होत असला तरी पश्चिम बंगालमध्ये साजरा होणारा दुर्गा उत्सव हा अधिक मोठय़ा प्रमाणात होत असतो. तिथे हा उत्सव संपूर्ण राज्याचाच मानला जातो. संपूर्ण हिंदुस्थानातच नव्हे, तर संपूर्ण जगात जेथे जेथे ऋतूंचे संक्रमण होते, रोगराई पसरते, त्याचा नायनाट करण्यासाठी व्रतस्थ राहिल्यास ती रोगराई दूर होते. आश्विन महिना येतो तेव्हा पावसाळा संपत आलेला असतो. रोगराई परम सीमेला पोहोचलेली असते. कफ प्रवृत्ती वाढलेल्या असतात. या कफ प्रवृत्तीला आराम पडावा यासाठी निरनिराळी व्रते सांगण्यात आलेली आहेत. धर्मशास्त्र आणि आरोग्य हा फार जवळचा विषय असल्यामुळे त्या दृष्टीने याकडे बघणे आवश्यक आहे.

नवरात्रात स्त्री शक्तीची पूजा केली जाते. त्या दृष्टीनेही नवरात्राला खूप महत्त्व आहे. वर सांगितल्याप्रमाणे सप्तधान्यं जी पेरली जातात, त्यामागे नवनिर्मिती ही संकल्पना आहे आणि सृष्टीमध्ये स्त्रीशिवाय कुठलीही प्रजाती नवनिर्मिती करू शकत नाही. त्यामुळेच संपूर्ण सृष्टीमध्ये स्त्री शक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शक्ती म्हणजे स्त्री आहेच; पण ज्यापासून नवनिर्मिती होते त्या प्रत्येक गोष्टीला शक्ती म्हणायला हरकत नाही, असे वाटते. सृष्टीतील या स्त्री शक्तीकडे आपण आदराने बघितले पाहिजे. तिचा आदर केला पाहिजे. स्त्राr शक्तीला धर्मशास्त्राने फार मोठा मान दिलेला आहे. नवरात्रात तो अधोरेखित होतो.
(लेखक पंचांगकर्ते आहेत)