तब्बल पाच वर्षे रखडलेला लोअर परळचा डिलाईल रोड पूल शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर नोव्हेंबरमध्ये सुरू झाल्यानंतर आता या पुलावर फुटपाथही बांधण्यात येत आहे. या पुलावर फुटपाथ नसल्याने स्थानिकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणून देत या ठिकाणी फुटपाथ बांधण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. या कामाचा बोर्डही पुलावर झळकवण्यात आला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर जाहीर केले आहे.
डिलाईल रोड पूल धोकादायक झाल्याने आयआयटीच्या अहवालानंतर 2018 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी बंद करत पाडण्यात आला. त्यानंतर 2022 मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला होणे अपेक्षित होते, मात्र 2020 मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि मुंबईतील कामांना ब्रेक लागला आणि डिलाईल रोड पुलाचे काम रखडले होते. पुलाचे काम रखडल्याने दक्षिण मुंबईतून पूर्व व पश्चिम उपनगरात जाणारी वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली. पूल सुरू करावा, अशी मागणी स्थानिकांसह विरोधकांनी लावून धरली. अनेक कारणांमुळे पुलाचे काम रखडले आणि पाच वर्षांनंतर गुरुवार 1 जून 2023 रोजी पुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. उर्वरित बाजू दिवाळीपर्यंत वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले, मात्र दिवाळी संपली तरी पूल वाहतुकीसाठी खुला होत नसल्याने आदित्य ठाकरे यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
असा आहे नव्या पुलाचा फायदा
z ना. म. जोशी मार्गावरील डिलाईल पुलामध्ये दोन्ही दिशेने प्रत्येकी तीन मार्गिका तर गणपतराव कदम मार्गावर दोन्ही दिशेला प्रत्येकी दोन मार्गिकांमुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत झाली आहे.
z जुन्या पुलाच्या तुलनेत गणपतराव कदम मार्ग आणि ना. म. जोशी मार्गावर अतिरिक्त मार्गिकेचा पर्याय उपलब्ध झाल्याने वाहतूक सुरळीत व्हायला मदत होत आहे. सेवा मार्गांची रुंदी वाढल्यामुळे तसेच पुलाखालील मोकळय़ा जागेमुळे पादचाऱयांची वहिवाट पूर्वीपेक्षा सुरळीत होणार आहे.