छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक परिसरातील पदपथावर दोघा अज्ञात व्यक्तींनी एका 29 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
22 सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. दोघा अज्ञातांनी मला उचलून बस आगाराच्या शेजारी असलेल्या टॅक्सी थांब्याजवळील पदपथावर नेले व तेथे दोघांनी बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप आहे. आरोपींनी त्या वेळी तोंड दाबले होते. त्यामुळे आरडाओरडा करता आला नाही, असेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी तिने आधी सीएसएमटी रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो गुन्हा पुढील कारवाईसाठी एमआरए मार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे. त्यानुसार एमआरए मार्ग पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करत आहेत. या प्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो एमआरए पोलिसांकडे वर्ग केला आहे.