माजी मंत्री व भाजपा नेते हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. आपल्या प्रवेशाची तारीख वरिष्ठ नेते लवकरच जाहीर करतील, असे त्यांनी सांगितले. मागील चार-पाच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर राजकीय भूमिकेसंदर्भात आपली दीड-दोन तास सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती इंदापूरची जागा महायुतीमधील घटक पक्षाला गेली आहे. विद्यमान आमदार ती लढवणार आहे. दुसरा पर्याय काढू असे ते चर्चेअंती म्हणाले. मात्र दुसऱया पर्यायाला कार्यकर्त्यांची संमती नव्हती. आपली ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर सुमारे दीड तास सविस्तर चर्चा झाली. पवारांनी सांगितले की, मी तालुक्याचा कानोसा घेतला आहे. त्यानंतर मी सर्व कार्यकर्त्यांना विचारले. आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जावे असा त्यांचा आग्रह होता. मी, माझे कार्यकर्ते, पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहीर करतो, असे हर्षवर्धन पाटील यांनी घोषित केले.