तरुणीला गुंगीचे औषध पाजून ब्लॅकमेल करणार्‍या बिल्डर पुत्राची निर्घृण हत्या, मुलीच्या मित्राने काढला काटा

गुंगीचे औषध पाजून काढलेले आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या बिल्डर पुत्राची निर्घृण हत्या केल्याची घटना ठाण्यात घडली आहे. पीडितेच्या मित्रानेच हा काटा काढला आहे. कोयत्याने एकापाठोपाठ 50 वार करून ही हत्या केली आहे. स्वयम परांजपे (33) असे मृत बिल्डर पुत्राचे नाव आहे. याप्रकरणी कोपरी पोलिसांनी मयुरेश धुमाळला ताब्यात घेतले आहे.

स्वयम परांजपे हा 28 एप्रिल रोजी एका लग्नसमारंभात गेला असताना त्याची 20 वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली. त्यावेळी स्वयमने तिला कारने घरी सोडतो असे सांगत सोबत घेऊन निघाला. मात्र वाटेत असताना त्याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून स्वतःच्या घरी घेऊन गेला. तिथे स्वयमने मोबाईलमध्ये तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढले. काही दिवसांनी त्याने तरुणीला काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत भेटण्यासाठी तगादा लावला. स्वयम सतत ब्लॅकमेल करत असल्याने मुलीने हा सर्व प्रकार तिचा मित्र मयुरेश याला सांगितला. त्यानंतर संतापलेल्या मयुरेशने कोपरीच्या अष्टविनायक चौकातील संचार सोसायटीत राहणार्‍या स्वयमवर कोयत्याने सपासप वार करून हत्या केली.

सखोल तपास सुरू

कोपरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मयुरेश धुमाळ याला ताब्यात घेतले आहे. मयुरेश याने स्वयमची हत्या का केली, खरेच तरुणीला ब्लॅकमेल केल्याच्या रागातून ही हत्या झाली आहे का, की या हत्येमागे आणखी काही कारण आहे याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत शिंदे यांनी दिली.