
टीम इंडियाचा माजी फलंदाज सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील राहत्या घरी संशायस्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सलील अंकोला याने यासंदर्भात इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय मॉम’ अशा आशयाची पोस्ट केली आहे. पुण्यातील डेक्कन परिसरातील गल्ली क्रमांक 14 मध्ये सलील अंकोलाच्या आई माला अंकोला या वास्तव्याला होत्या. त्यांचे वय 77 वर्ष असून त्या एकट्याच राहत असल्याची माहिती समोर आली आहे. मोलकरीण त्यांच्या घरी आली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेची गांभिर्याने दखल घेत मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सलील अंकोला टीम इंडियाचे माजी फलंदाज असून 1989 ते 1997 या कालावधीत त्यांनी टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे सलील आणि सचिन तेंडूलकर यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात सोबतच केली होती. तसेच सलीलचे वडील अशोक अंकोला हे आयपीएस दर्जाचे पोलीस अधिकारी होते.