Badlapur Sexual Assault Case तुषार आपटे, उदय कोतवाल, अर्चना आठवले यांना जामीन मंजूर

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी शाळेचे संचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे तसेच मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तिघांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

बदलापूरच्या शाळेतील दोन चिमुकलींवर अत्याचारप्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली होती. मात्र हे प्रकरण दडपण्यासाठी शाळा व्यवस्थापन व संस्थाचालकांनी शाळेतील 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब केले. तसेच दाद मागण्यासाठी आलेल्या पीडितांच्या पालकांना हाकलून देत अशी कोणतीही घटना शाळेच्या आवारात घडलीच नाही असा कांगावा केला होती. या सर्व बाबी चौकशीदरम्यान उघड झाल्यानंतर शाळेच्या संस्थाचालकांसह सचिव आणि मुख्याध्यापिका यांच्यावर पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यादिवसापासून संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे आणि मुख्याध्यपिका अर्चना आठवले हे फरार होते. कर्जतच्या एका फार्म हाऊसमधून त्यांना अटक करण्यात आली होती.