तिरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादात प्राण्यांची चरबी असल्याचा वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी केली. न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी एक स्वतंत्र एसआयटी समीती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या कोट्यावधी लोकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही एसआयटी तपासाचे आदेश दिल्याचे न्यायमूर्ती बीआर गवई यांनी म्हटले आहे. सीबीआयचे 2, एपीचे 2 आणि FSSAI चे सदस्य आणि तज्ज्ञ यांचा समावेश असलेली SIT स्थापन करावी, असे आदेश न्यायालयाने राज्य पोलिसांना दिले आहेत.
प्रसादातील भेसळीच्या आरोपांमुळे जगभरातील भाविकांच्या श्रद्धेला धक्का बसला आहे. या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, अशी आमची इच्छा आहे. स्वतंत्र संस्थेने या प्रकरणाची चौकशी केल्यास लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल, असेही न्यायालयाने नमूद केले.
देवाला राजकारणापासून दूर ठेवा, मागच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती गवई यांनी टिप्पणी करत सांगितले होते. प्रयोगशाळेच्या चाचणीचा अहवाल पूर्णपणे स्पष्ट नसल्याने नाकारण्यात आलेल्या तूपाची चाचणी करण्यात आली होती.