नगरकरांची सवलतीकडे पाठ; 24 दिवसांत फक्त साडेचार कोटी थकबाकी जमा

नगर महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी मालमत्ताकराच्या शास्तीमध्ये शंभर टक्के सूट देऊनही थकबाकीदार पैसे भरण्यास तयार नाहीत. गेल्या 24 दिवसांत केवळ साडेचार कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली. शास्ती माफीच्या सवलतीचे आता केवळ चार दिवस उरले असून, महापालिका प्रशासनासमोर थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

‘एकरकमी थकबाकी भरा आणि जप्तीची कारवाई टाळा,’ असे आवाहन करत आयुक्त डांगे यांनी थकबाकीदारांना 28 सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के शास्ती माफीची सवलत दिली. मात्र, थकबाकीदारांनी या सवलतीकडे पाठ फिरवली आहे.

गेल्या 24 दिवसांत केवळ साडेचार कोटी रुपये वसूल झाले आहेत. मालमत्ताधारकांनी 232 कोटी रुपयांचा कर थकविला आहे. ही थकबाकी वसूल करताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. थकबाकीदारांना दिलासा देऊन जास्तीतजास्त वसुली व्हावी, या उद्देशाने तत्कालीन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी शास्तीमध्ये 100 टक्के व नंतर 75 टक्के, अशी दोनदा सूट दिली होती. मात्र, थकबाकीदारांनी या सवलतीकडे दुर्लक्ष केले.

शहरामध्ये आज अनेक मालमत्ता अशा आहेत की त्याचा करही भरलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. विशेष म्हणजे यातील काही प्रकरणे न्याय प्रविष्ट आहेत. त्यामुळे त्याची थकबाकी कशा पद्धतीने मिळणार, हासुद्धा मोठा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर आहे.

ऑक्टोबरमध्येजप्तीची मोहीम

शहरातील सुमारे 26 हजार मालमत्ताधारकांना लोकअदालतीमार्फत थकबाकीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या थकबाकीदारांची लोकअदालतीमध्ये सुनावणी होणार आहे. या नोटिसा मिळूनही थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. ऑक्टोबर महिन्यात मनपाची ही जप्तीची मोहीम सुरू होणार आहे.

26 हजार जणांना नोटीस

आता आयुक्त डांगे यांनी थकबाकीदारांना पुन्हा 100 टक्के शास्ती माफीची सवलत दिली. त्याचबरोबर सुमारे 26 हजार थकबाकीदारांना लोकन्यायालयाच्या माध्यमातून नोटिसा पाठवल्या आहेत. वसुली कर्मचारी घरोघरी जाऊन थकबाकी भरण्याचे आवाहन करीत आहेत. चार दिवसांनी शास्ती माफीची सवलतदेखील संपणार आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

अशी आहे थकबाकी

एकूण मागणी 259 कोटी

वसूल थकबाकी 31 कोटी

एकूण थकबाकी 232 कोटी

सवलतीनंतर वसुली 4.5 कोटी

प्रभागनिहाय थकबाकी

सावेडी 71 कोटी

शहर 39 कोटी

झेंडीगेट 38 कोटी

बुरूडगाव 83 कोटी