कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात 21 वर्षीय तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. कालच वानवडी भागात सहा वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आता सामूहिक बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री बोपदेव घाट परिसरात 21 वर्षीय तरुणी मैत्रिणीसोबत गेली होती. त्याठिकाणी रात्री अकराच्या सुमारास तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांना ही माहिती मिळाली. त्यांनतर गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्याचार, विनयभंगाच्या घटना कमी होत नसल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना तयार झाली आहे.