अलिबागच्या मुनवली-मुशेत गावात बेकायदा भराव करून अनधिकृत बंगल्यांचे इमले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बंधूंचा कारनामा

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांनी सत्तेच्या बळावर अलिबागच्या मुनवली-मुशेत गावात बेकायदा भराव करून अनधिकृत बंगल्यांचे इमले बांधले आहेत. या भरावामुळे नैसर्गिक प्रवाह बुजून आजूबाजूच्या गावांत पाणी घुसत भातशेतीचे प्रचंड नुकसान होत असल्याने ग्रामस्थांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे.

अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुनवली-मुशेत येथे भूमापन क्रमांक व उपविभाग नंबर 7/8/9/82/83/02/03 ही मिळकत असून याचे सातबारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांच्यासह निकीता संघवी, समीर संघवी, पंखुरी डालमिया, हर्ष डालमिया, चंद्रेश अंबानी, सुवर्णा अंबानी, जतीन संघवी, फाल्गुनी संघवी, ममता पानथुला, शीतल अग्रवाल, सुरुची युसूफ, हर्ष डालमिया यांच्या नावे दाखल आहेत. या जमिनींमध्ये रस्त्याचे काम करताना नियम धाब्यावर बसवण्यात आले असून महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठय़ा प्रमाणात अनधिकृत भराव करण्यात आला आहे. या बेकायदा भरावावर राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, पंखुरी डालमिया व शीतल अग्रवाल या तिघांनी बेकायदा बंगले उभे केले आहेत.

नार्वेकर यांच्या या दंडेलीविरोधात मापगाव ग्रामपंचायतीसह गावकऱ्यांनी 13 ऑक्टोबर 2021 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत तक्रार केली आहे. ग्रामस्थांनी आवाज उठवल्यानंतर त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. त्यानंतर  26 ऑक्टोबर 2021 रोजी मंडळ अधिकारी व तलाठय़ांनी घटनास्थळावर जात पंचनामा केला. त्या वेळी हजारो ब्रास मातीचा बेकायदा भराव केल्याचे उघड झाले. तसेच चार अनधिकृत बंगले बांधल्याचा ठपकाही ठेवला. याबाबत झिराड मंडळ अधिकाऱ्यांनी  अहवाल अलिबाग तहसीलदारांना पाठवला आहे. परंतु त्यानंतर राजकीय दबावामुळे अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत.

 मंडळ अधिकारी गायब

मापगावच्या मुनवली-मुशेतमधील भरावाबाबत तहसीलदार विक्रम पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सरकारी ‘टेप’ वाजवत माहिती घेतो, नंतर सांगतो, असे मोघम उत्तर दिले. तर झिराड मंडळ अधिकारी ‘गायब’ असून त्यांचा दूरध्वनीच लागत नसल्याचे समोर आले आहे.