महिला सक्षमीकरण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा येत्या शनिवारी ठाण्यात होणार असून त्यांच्या या सभेमुळे ठाण्यातील बिल्डरांचे भाग्य फळफळले आहे. कासारवडवलीच्या बोरिवडे गावाजवळ होणाऱया या सभेची जय्यत तयारी सुरू असून 14 वाहनतळांच्या नावाखाली बिल्डरांच्या प्लॉटवरील जंगलाची बेसुमार कत्तल करून त्यांचे प्लॉट फुकटात सपाट करून देण्यात येत आहेत. या प्लॉटवर जाण्यासाठी रस्तेही बनवण्यात आले. त्यासाठी ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर पालिकेच्या तिजोरीतून पैसा ओतण्यात आला आहे. झाडांच्या कत्तलीसाठी ना कोणत्या परवानग्या तसेच रस्ते आणि प्लॉट सपाटीकरणासाठी ना कुठले टेंडर काढण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या बिल्डर मित्रांसाठी सारे काही चकटफू करून दिल्याने बिल्डरांची दसऱयाआधीच दिवाळी झाली आहे. गेले आठ दिवस घरघरणाऱया जेसीबीच्या वरवंटय़ाखाली हरितपट्टय़ाची मात्र राखरांगोळी झाली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि महिला सक्षमीकरण योजनेच्या कार्यक्रमासाठी शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कासारवडवलीजवळील बोरिवडे येथील वालावलकर मैदानात होणार आहे. हा संपूर्ण परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत आहे. या परिसरात पर्यावरणाची जैवविविधता मुबलक प्रमाणात आहे. या बोरिवडे परिसरातच हाऊसिंग प्रोजेक्ट मंजूर झाले आहेत. मात्र त्यांच्या प्लॉटवर वाढलेले जंगल आणि दुर्मिळ वृक्षतोडीच्या परवानग्या मिळणे अत्यंत जिकिरीचे असल्याने हे प्लॉट धूळखात पडले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या या बिल्डर मित्रांचे प्लॉट फुकटात ‘क्लियर’ करण्याची नामी क्लुप्ती शोधली आहे. मोदींची सभा ज्या वालावलकर मैदानावर होणार आहे त्याच्या आजूबाजूचे हे 14 प्लॉट वाहनतळ उभारण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. एक झाड तोडायचे असेल पिंवा एक रस्ता बनवायचा असेल तर महापालिकेच्या अनेक परवानग्यांच्या दिव्यातून जावे लागते. मात्र या प्लॉटवर वाढलेले जंगल, दुर्मिळ वृक्ष, औषधी झाडे यांची मिंधे सरकार पुरस्कृत बेसुमार कत्तल करण्यात आली आहे.
25 कोटींचा बिनबोभाट खर्च
त्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून दहा ते पंधरा जेसीबी या 14 प्लॉटवर अखंडपणे घरघरत हा हरितपट्टा चिरडत सुटले आहेत. झाडांची कत्तल झाल्यावर तेथील लहानमोठे खडक पह्डून हे प्लॉट रोडरोलरने सपाट करत त्यावर पाण्याच्या टँकरने पाणी मारून ते गुळगुळीत करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे किमान 20 ते 25 कोटींचा खर्च असलेल्या कामासाठी ना वृक्षतोडीची परवानगी घेण्यात आली ना कोणते टेंडर काढण्यात आले.
पालिकेचे अधिकारी प्रचंड दहशतीखाली
मिंधे सरकारच्या या कार्यक्रमासाठी आणि त्यातून बिल्डर मित्रांचे चांगभले होण्यासाठी या खर्चाचा भार ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर महापालिकेवर टाकण्यात आला आहे. सरकारच्या लाडक्या कत्राटदारांमुळे आधीच या महापालिकांची आर्थिक स्थिती खालावली असताना या नव्या भुर्दंडामुळे त्यांचे बजेट कोलमडणार आहे. या तीनही महापालिकांचे शेकडो कर्मचारी या कामासाठी जुंपण्यात आले असून महापालिकांचे मुख्य अभियंता व नगर अभियंता प्रचंड दहशतीखाली असल्याची चर्चा आहे.
गर्दीसाठी आटापिटा; प्रभाग समितीला टार्गेट
कार्यक्रमासाठी 50 हजारांची गर्दी जमवण्यासाठी ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर महापालिकेतील प्रत्येक प्रभाग कार्यालयांना 25 ते 30 बसेस भरून आणण्याचे टार्गेट दिले असून त्यात महिलांची गर्दी जमवा, असे सक्त आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी वेगळा 2 ते 5 कोटींचा खर्च येणार आहे.
कौसा स्टेडियमला कार्यक्रम का घेतला नाही?
मुंब्य्रात कौसा येथे सुसज्ज स्टेडियम उभारण्यात आले आहे. इतकी मशिनरी, शेकडो कामगार, करोडो रुपयांचा चुराडा आणि हजारो झाडांच्या कत्तली करण्यापेक्षा कौसा येथे हा कार्यक्रम का घेतला नाही, असा सवाल ठाणेकरांनी केला आहे.