महाराष्ट्रात अराजक माजलेय… एकनाथांच्या नावाने तोतयेगिरी करणाऱ्यांचा नायनाट कर! उद्धव ठाकरे यांचे जगदंबेला साकडे

महाराष्ट्रात सध्या अराजक माजलेय. असेच अराजक शिवछत्रपतींच्या आधी संपूर्ण देशावर आले होते. त्या वेळी संत एकनाथांनी ‘बये दार उघड’ अशी आरोळी दिली होती. आज एकनाथांच्या नावाने तोतयेगिरी करणारे खूप दिसताहेत, त्या तोतयेगिरीचा नायनाट कर, असे साकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आई जगदंबेला घातले.

शिवसेनेने तयार केलेल्या ‘असुरांचा संहार कराया मशाल हाती दे, सत्वर भूवरी ये गं अंबे सत्वर भूवरी ये’ या गीताचे अनावरण घटस्थापनेच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शिवसेना भवन येथे झाले. त्याप्रसंगी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माता-भगिनींवर अत्याचार होताहेत, त्यांच्या हाती मशाल दे, तुझे तेज दे, भ्रष्टाचार अराजक जाळून भस्म कर, असे साकडे या गीताच्या माध्यमातून शिवसेनेने घातले असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

शिवसेना गेली दोन-अडीच वर्षे न्याय मंदिराची दारे ठोठावतेय. आमचे हात दुखायला लागले. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय मिळत नाही. शेवटी आम्ही जगदंबेलाच साकडे घातले की, आता तू तरी दार उघड, असे सांगतानाच शिवसेना आता जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी जातेय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी या वेळी मिंधे सरकारवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सगळी तोतयेगिरी चालली आहे. घटनाबाह्य सरकार वारेमाप भ्रष्टाचार करतेय. महिलांवर अत्याचार होत आहेत आणि त्यांना वाचवणारा कुणीही त्राता दिसत नाही. आई जगदंबेला मनापासून हाक मारल्यानंतर ती भक्तांच्या रक्षणासाठी धावून येते हे इतिहासात वेळोवेळी दिसले आहे. याही वेळेला ती तिचे सत्त्व दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी आदी उपस्थित होते.

दसरा मेळाव्यात सर्वांचाच हिशेब चुकता करणार

अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या वक्तव्यांबाबत पत्रकारांनी विचारले असता सणासुदीचे दिवस असल्याने आता राजकीय काही नको, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी त्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. कुणाला काहीही बोलायचे असेल त्यांना बोलू द्या, शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवतीर्थावर होणार असून तिथे आपण ‘सौ सुनार की, एक लोहार की’ या तत्त्वाने हिशेब करून टाकू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा

ज्येष्ठ लेखक, गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी हे गीत लिहिले असून राहुल रानडे यांनी संगीत दिले आहे. नंदेश उमप यांनी आपल्या पहाडी आवाजात हे गीत गायले आहे. उद्धव ठाकरे यांनी याबद्दल या तिघांचेही या वेळी कौतुक केले आणि सत्कारही केला. नंदेश उमप यांच्यावर साडेतीन महिन्यांपूर्वीच हृदय शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांनी गायलेले हे पहिले गाणे आहे. त्यांचा आवाज आजही ठणठणीत आणि पहाडी आहे. अंगावर रोमांच उभा करणारा आहे. नंदेश आणि गोडबोले यांनी या गाण्यामध्ये जान ओतली आहे, असे प्रशंसोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे गीत पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

गोंधळगीत

दार उघड बये दार उघड
सत्वर भूवरी ये गं अंबे सत्वर भूवरी ये
आदिमाये तू ये… आदिशक्ती तू ये….
असुरांचा संहार कराया मशाल हाती दे

दुष्ट मातले फार तयांचे मर्दन करण्या ये
अत्याचारी दैत्यांपासून अभय आम्हाला दे
पाप वाढले घोर… जाळण्या मशाल हाती दे
सत्वर भूवरी ये गं अंबे सत्वर भूवरी ये

धारदार तलवार हाती घे भवानी बनूनी ये
महिषासुर मारून टाकण्या दुर्गा बनूनी ये
शुंभ निशुंभ विनाश करण्या जगदंबे तू ये
पाप वाढले घोर जाळण्या मशाल हाती दे
सत्वर भूवरी ये गं अंबे सत्वर भूवरी ये

स्त्राrची अब्रू लुटणारे ते दैत्य माजले आता
मायभगिनींना पुणी न उरला वाचविणारा त्राता
होऊनिया रणचंडिका तू रक्षण करण्या ये
असुरांचा संहार कराया मशाल हाती दे
सत्वर भूवरी ये गं अंबे सत्वर भूवरी ये

– गीत – श्रीरंग गोडबोले
– संगीत – राहुल रानडे
– गायक – नंदेश उमप