निवडणुकांच्या तोंडावर का होईना अखेर केंद्र सरकार झुकलं… मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यानिमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी जगभर पसरलेल्या मराठी भाषिकांचे अभिनंदन केले आहे. निवडणुकांच्या तोंडावर का होईना अखेर केंद्र सरकार झुकलं, असा टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही अनेकदा केंद्रातील मंत्र्यांच्या भेटी व पत्र व्यवहार झाला होता. येत्या महिनाभरात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याची घोषणा केली.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट एक पोस्ट शेअर केली आहे. ”गेल्या कित्येक वर्षांचा मराठी भाषिकांचा लढा, मागच्या अनेक सरकारांचा केंद्रासोबतचा पत्र व्यवहार, मविआ सरकारच्या काळात केलं गेलेलं दस्तावेजीकरण आणि तमाम मराठी मनांच्या तीव्र इच्छाशक्तीपुढे अखेर केंद्र सरकार झुकलं आणि निवडणुकांच्या तोंडावर का होईना आपल्या मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळाला! जगभर पसरलेल्या मराठी भाषिकांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्याचवेळी केंद्राला एक आठवण, आता महाराष्ट्राचे पळवलेले उद्योगही परत आणा, मराठी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवा आणि मराठी माणसाच्या हक्काची ‘गिफ्ट सिटी’ मुंबईला परत द्या! असेही आदित्य ठाकरे म्हणाले.