मुंबई उच्च न्यायालयात आज पुन्हा अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने तपास गांभीर्याने आणि जलदगतीने करण्याचे आदेश दिले. अक्षय शिंदेचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही चौकशी जलदगतीने करून १८ नोव्हेंबरपर्यंत चौकशी अहवाल सादर करा, असे आदेश न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने मॅजिस्ट्रेटना दिले.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांच्यावतीने अॅड. अमित कटारनवरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. या सुनावणीवेळी खंडपीठाने सर्व पुरावे फॉरेन्सिक तज्ञांमार्फत सुरक्षितरित्या जतन करून ठेवण्याचे आदेशही दिले. खंडपीठाने मागील सुनावणीवेळी एन्काऊंटरवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
पोलिसांनी केलेल्या कथित एन्काऊंटरच्या चौकशीसाठी राज्य सरकारने चौकशी आयोग नेमला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (निवृत्त) दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी आयोग नेमण्यात आला आहे. या आयोगाची माहिती आज न्यायालयाला देण्यात आली.