एकनाथांच्या नावानं तोतयागिरी करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं जगदंबेला साकडं

गेल्या दोन-अडीच वर्षापासून आम्ही न्यायमंदिराची दारं ठोठावत आहोत. हात दुखायला लागले आहेत. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, पण अजूनही न्याय मिळत नाही. त्यामुळे आम्ही ठरवले की जगदंबेलाच साकडे घातले पाहिजे, तू तरी दार उघड, असे म्हणत एकनाथांच्या नावाने तोतयागिरी करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आई जगदंबेला आणि जनता जनार्दनाला साकडे घातले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जनतेला नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी घटनास्थापनेच्या मुहूर्तावर आई जगदंबेसाठी तयार करण्यात आलेल्या गाण्याचे अनावरण करण्यात आले. ‘असुरांचा संहार कराया मशाल हाती दे, सत्वर भूवरी ये गं सत्वर भूवरी ये’, असे या गाण्याचे बोल असून हे गीत श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले आहे, तर नंदेश उमप यांनी गायले आहे. या दोघांचा उद्धव ठाकरे यांनी यथोचित सत्कार केला. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावत, खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

आम्ही जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी जात आहोत. आता जनतेच्या दरबारात लढाई सुरू झाली आहे. राज्यात सगळी तोतयेगिरी सुरू असून घटनाबाह्य सरकार वारेमाप भ्रष्टाचार करतंय, महिलांवर अत्याचार होताहेत. कुणी त्राता दिसत नाहीत. आई जगदंबेला मनापासून हाक मारल्यावर ती भक्तांच्या दर्शनासाठी येते हे वेळोवेळी इतिहासात दिसले असून यावेळीही दिसेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

राज्यात अराजक माजले आहे. त्याचा नायनाट करण्यासाठी एक अराजकीय गाणे जगदंबेसाठी तयार केल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. राज्यात तोतयेगिरी सुरू आहे. तोतयेगिरीचा उल्लेख यासाठी केला की असेच अराजक शिवछत्रपतींच्या आधी संपूर्ण देशावर आले होते. तेव्हा संत एकनाथ यांनी ‘बाई दार उघड…’ अशी आरोळी मारली होती. आता एकनाथांच्या नावाने तोतयेगिरी करणारे खूप दिसताहेत. या तोतयेगिरीचा नायनाट करण्यासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे गाणे जगदंबेच्या आणि जनतेच्या चरणी सादर करत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)