मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणात ED चे समन्स

हिंदुस्थानी संघाचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने समन्स पाठवले होते आणि आज हजर राहाण्यास सांगितले होते. मात्र अजहरुद्दीन आज ईडीसमोर हजर राहिले नाहीत. त्यांनी यासाठी तपास यंत्रणेकडून वेळ मागितला आहे. आता ईडी नवीन समन्स जारी करणार आहे. अजहरुद्दीनवर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या फंडामध्ये 20 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

मोहम्मद अजहरुद्दीन सप्टेंबर 2019 मध्ये हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. जून 2021 मध्ये त्यांना हे पद सोडावे लागले होते. असोसिएशनच्या फंडामध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली होती. ईडीने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांविरोधात मनी लाँड्रिंगचे प्रकरण तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी ईडीने तेलंगणामध्ये 9 ठिकाणांवर छापेमारी केली होती आणि अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली होती.

ईडीनुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीत आर्थिक गैरव्यवहार केला. त्यांनी खासगी कंपनींना चढ्या दरात ठेके दिले आणि असोसिएशनला कोट्यावधी रुपयांचे नुकसान पोहोचवले. याप्रकरणी ईडीने तीन एफआयआर दाखल केले आणि पुढील तपास सुरू आहे.