देश वाऱ्यावर सोडून पंतप्रधान, गृहमंत्री निवडणुकीच्या प्रचारासाठी गल्लीबोळात फिरताहेत! – संजय राऊत

Pc - Abhilash Pawar

जागावाटपाबाबत दसऱ्याच्या आत सगळे चित्र स्पष्ट होईल. आमच्या जागावाटपासाठी दिल्लीतून कुणाला यावे लागणार नाही. इथे देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान जागावाटपासाठी येत आहेत. देश वाऱ्यावर सोडून निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान, गृहमंत्री गल्लीबोळात फिरत आहेत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

आज पंतप्रधान ठाण्यात येत आहेत. उद्या कोपरीला जातील, परवा पाचपाखाडीला, मग नवपाडा, घंटारी, भांडूप, कांजूलाही जातील. पंतप्रधानांनी पंतप्रधानासारखे वागायला हवे. देशाचा पंतप्रधान, गृहमंत्री असा गल्लोबाळात प्रचार करताना कधी पाहिला आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, सरदार पटेल की मुंबईत किंवा गुजरातमध्ये जागावाटपाला येऊन बसायचे का? त्यांनी देशाचा, राष्ट्राचा विचार केल्याने त्यांना सरदार म्हणतात. वॉर्डा वॉर्डात जाऊन ते निवडणुकीचा प्रचार करत नव्हते. एकच सभा घ्यायचे आणि ते पुरेसे असायचे. पण आताचे गृहमंत्री आणि पंतप्रधान देश वाऱ्यावर सोडून गल्लीबोळात प्रचाराला फिरत आहेत. वन नेशन, वन इलेक्शन यांना झेपणार आहे का? गृहमंत्री अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात फिरत आहेत. पंतप्रधांनांनीही एकाच मेट्रोचे सहा वेळा उद्घाटन केले. आज घो़डबंदर रोडला येत आहेत. आधी तिथल्या वाहतुकीची समस्या सोडला, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

वोट जिहाद हा भाजपच्या डोक्यातील कचरा

वोट जिहादचा आरोप करणाऱ्या भाजपलाही संजय राऊत यांनी झोडपले. हिंदू, मुसलमान, जैन, पारशी, शिख, बौद्ध, ख्रिश्चन हे सगळे या देशाचे नागरिक आहेत. ते सगळेच मतदान करतात. वाट जिहात असेल तर भाजपने मुस्लिम महिलांसाठी तिहेरी तलाकचा कायदा कशासाठी आणला? महाराष्ट्रात गुजराती लोकं भाजपला मतं देतात असे कळते, त्याला गुजरातींचा वोट जिहाद बोलणार का? फडणवीस सारख्या नेत्यांना देशाचे पुन्हा तुकडे करायचे आहेत का? असा सवालही राऊत यांनी केला. तसेच वोट जिहाद हा भाजपच्या डोक्यातील कचरा असल्याचेही ते म्हणाले.

संजय राऊत यांनी सांगितलं महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र; म्हणाले, “भाजप आणि गद्दार गटांचा…”

सगळ्या बोटांचा हिशेब होणार

नांदेडमधील लोहा येथे सोशल मीडियावर भाजपबाबत भावना व्यक्त करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्याला काही गुंडांनी घेरून हल्ला केला आणि त्याची बोटं कापली. कुठे आहेत गृहमंत्री? पोलीस काय करत आहेत? समान नागरी कायद्याप्रमाणे आम्हीही कायदा हातात घेऊ शकतो आणि बोटं कापू शकतो. शिवसैनिकांमध्ये ती क्षमता आहे. भाजपला वाटते कायदा त्यांच्या घरी भांडी घासतो. दोन महिने थांबा, सगळ्या बोटांचा हिशेब होणार, असा इशाराही राऊत यांनी दिला.