पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. अद्याप कोण, किती जागांवर लढणार हे स्पष्ट झालेले नसले तरी महाविकास आघाडीचे सूत्र काय असणार आहे याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
गुरुवारी सकाळी जागावाटपासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, तीन पक्ष आणि घटकपक्षांची चर्चा पूर्ण झाल्यानंतर कोण, कुठून लढते हे कळेल. पण बैठकीमध्ये आम्ही आकड्यांवर बोलत नाही आहोत. तिन्ही पक्षांचे प्रमुख तुम्ही इतक्या जागा लढायच्या, आम्ही इतक्या लढू यावर बोलत नसून प्रत्येक मतदारसंघात आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढतोय. हेच आमचे सूत्र आहेत. लोकसभेलाही हेच सूत्र होते आणि विधानसभेलाही हेच सूत्र असेल.
बैठकीमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर आमची चर्चा होत आहे. कारण प्रत्येक मतदारसंघात लढण्याचे, जिंकण्याचे वेगळे पैलू असतात. उमेदवाराची क्षमता, पक्षाची ताकद किती याच्यावर प्रत्येक मतदारसंघानुसार चर्चा होत असल्याने थोडा वेळ लागतोय, असेही राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, तुम्ही 100 लढा, आम्ही 80 लढतो, ते 70 लढतील अशा आकड्यांवर गेलो असतो तर हा तासाभराचा खेळ असता. पण आम्हाला भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्याबरोबरच्या गद्दार गटांचा पराभव करायचा आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराचा आणि आर्थिक ताकदीचा पराभव करायचा आहे.
View this post on Instagram
निवडणूक लांबणीवर पडणार नाही. 26 नोव्हेंबरच्या आधी नवीन विधानसभा प्रस्थापित करावी लागेल, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत ठामपणे म्हणाले.