ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्यावर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना पुरातत्व विभागाने महापालिका प्रशासनाला पाच महिन्यांपूर्वी दिल्या होत्या. मात्र पालिका प्रशासनाने संबंधितांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. पालिका प्रशासन दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने पुरातत्व विभागाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र वैभव-राज्य संरक्षित स्मारक योजनेंतर्गत घोडबंदर किल्ल्याचा विकास करण्यास शासनाने 2019 साली मंजुरी दिली होती. त्यानंतर किल्ल्याचा विकास आराखडा तयार करत पुरातत्व विभागाच्या मदतीने किल्ल्याच्या संवर्धनाचे काम पालिकेने हाती घेतले. 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंतीनिमित्त या किल्ल्यावर स्वराज्याचे प्रतीक म्हणून 105 फूट उंच ‘भगवा ध्वज’ उभारण्यात आला आहे. मात्र हा ध्वज उभारताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुरातत्व खात्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. ध्वज उभा करण्यासाठी या किल्ल्यावर अनधिकृत बांधकाम करण्यात आले. याबाबत पुरातत्व विभागाचे तत्कालीन संचालक तेजस गर्गे यांनी 10 एप्रिल रोजी महापालिकेला पत्र पाठवून याबाबतचा खुलासा करण्यास सांगितले.
आयुक्तांवरही कारवाईची मागणी
पालिका आयुक्त संजय काटकर यांनी पुरातत्व विभागाचे पत्र मागील पाच महिन्यांपासून दाबून ठेवले होते, त्यावर कुठलीच कारवाई करत नव्हते. यामुळे याला जबाबदार असणाऱ्या आयुक्त संजय काटकर यांच्यावरसुद्धा जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी नगरसेवक व समाजसेवक रोहित सुवर्णा यांनी केली आहे