बदलापूरमधील शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना पुण्यातील वानवडी भागातही अशीच धक्कादायक घटना घडली आहे. स्कूलबसमध्येच चालकाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नराधम बसचालकाला अटक केली आहे. याबाबत मुलीच्या 35 वर्षीय आईने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडण्याचे काम करत असतो. फिर्यादीची 6 वर्षीय मुलगी त्या बसमधून रोज ये जा करते. 30 सप्टेंबर रोजी चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर नराधम बस चालकाने लैंगिक अत्याचार केला. दोन्ही चिमरुड्यांना जवळ बसवून त्यांच्यासोबत त्याने अश्लील चाळे केले.
चिमुरडी घरी आल्यानंतर तिला प्रायव्हेट ठिकाणी वेदना होत होत्या. यानंतर मुलीच्या आईने याची विचारपूस केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी 45 वर्षीय आरोपीला अटक केली. मात्र, सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.