बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी गृह विभागाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या एकसदस्यीय आयोगाची स्थापना केली आहे.
राज्य शासनाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. 23 सप्टेंबर रोजी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. त्या एन्काऊंटरसाठी कोणतीही व्यक्ती, गट किंवा संघटना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार होती का, यासंदर्भात न्यायमूर्ती भोसले आयोग चौकशी करणार असल्याचे अधिसूचनेत नमूद आहे. तीन महिन्यांत या आयोगाला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती.