ठाणे कारागृहाबाहेर फिरते न्याय सहाय्य केंद्र
मुंबईतील ‘दर्द से हमदर्द तक ट्रस्ट’मार्फत आर्थर रोड कारागृहानंतर ठाणे कारागृहाबाहेर फिरते न्याय सहाय्य केंद्र सुरू केले जात आहे. शनिवार, 5 ऑक्टोबर रोजी ठाणे जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी एस. के. फोकमारे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन केले जाणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी, ठाणे कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले, ज्येष्ठ फौजदारी वकील प्रकाश सालसिंगिकर उपस्थित राहणार आहेत. केंद्र उभारणीसाठी मानस कृषी इंडस्ट्रीने सहकार्य केले आहे. संस्थेच्या ट्रस्टी सुनीता खंडाळे-सालसिंगिकर यांनी ही माहिती दिली.
दृष्टिदोष असणाऱ्यांना स्मार्ट-ऑन एआय चष्मे
राज्यातील दृष्टिदोष असलेल्या 200 नागरिकांना मुंबई विद्यापीठात पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात स्मार्ट-ऑन एआय चालित अत्याधुनिक चष्म्यांचे वाटप करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून उम्मीद फाऊंडेशन व सक्षण लोकांचा आवाज यांच्या विद्यमाने स्मार्ट-ऑन एआय चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात अंजुमन ए इस्लामचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. जहिर काझी, उम्मीद फाऊंडेशनचे अध्यक्ष परवेज फरीद आदी मान्यवर उपस्थित होते.
1.34 कोटींचा गांजा जप्त
सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून 1.34 कोटींचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी परदेशी नागरिकाला सीमा शुल्क विभागाने अटक केली. सोमवारी एक प्रवासी हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेतले. त्याच्या साहित्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे काही पॅकेट आढळून आले. त्या पॅकेटमध्ये 1346 ग्रॅम विदेशी गांजाचा साठा होता. त्या गांजाची किंमत सुमारे 1 कोटी 34 लाख रुपये इतकी आहे. त्या प्रवाशाने व्हॅक्युम सील बंद पॅकेटमध्ये पॅक करून आणले होते. गांजा तस्करीप्रकरणी त्या प्रवाशाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
तामीळनाडूतील कुख्यात गुंड गजाआड
तामीळनाडू येथील एक कुख्यात गुंड हत्येचा गुन्हा करून मुंबईत लपला आहे. तसेच तो चेंबूरच्या आरसीएफ परिसरात पेट्रोलच्या टँकरवर काम करत असल्याची माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-6 ने शिताफीने सापळा रचून त्या गुंडाला पकडले. पुढील कारवाईसाठी त्याला तामीळनाडू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चिन्न सुब्बाराव अयनार (24) असे त्या गुंडाचे नाव आहे. तो आरसीएफ परिसरात पेट्रोल टँकरवर काम करत होता. तामीळनाडूतल्या वेल्लूर येथे हत्येचा गुन्हा करून एक तरुण मुंबईत आला असून तो आरसीएफ परिसरात काम करत असल्याची माहिती युनिट-6 चे अंमलदार नागनाथ जाधव यांना मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक भरत घोणे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करून त्या आरोपीचा शोध घेतला.
शिवनेरी सुंदरीची भुरळ सोडून कर्मचाऱ्यांचे प्रलंबित भत्ते द्या!, एसटी कर्मचारी संघटनेची मागणी
एसटीचे कर्मचारी हे ब्रँड अॅम्बेसेडर व सुंदरीपेक्षा चांगली सेवा प्रवाशांना देतात. त्यामुळे शिवनेरी सुंदरीची भुरळ सोडावी आणि ब्रँड अॅम्बेसेडर व शिवनेरी सुंदरीवर खर्च करण्यापेक्षा कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाचा फरक, डीएची थकबाकी व वार्षिक वेतनवाढ, प्रलंबित थकबाकी द्यावी आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे. ही योजना परिस्थितीला अनुसरून नाही. आजही कर्मचारी व प्रवाशांच्या अनेक समस्या आहेत. त्याकडे लक्ष दिल्यास उत्पन्न वाढ होऊन प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देता येतील असे संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले.
प्रशांत किशोर यांनी काढला नवा पक्ष
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज जन सुराज या त्यांच्या नव्या पक्षाची घोषणा केली. बिहारमध्ये त्यांचा जन सुराज हा पक्ष मोठा करिश्मा करून दाखवेल, असा दावाही त्यांनी केला आहे. मनोज भारती हे या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत. पाटणा येथील व्हेटरनरी महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. गेल्या अडीच वर्षांपासून जन सुराज पक्ष आणण्याची तयारी सुरू होती. निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृतरीत्या पक्षाचा दर्जा आहे, असे प्रशांत किशोर म्हणाले.
प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धेला देशभरातून भरघोस प्रतिसाद
प्रबोधन गोरेगाव आणि साप्ताहिक ‘मार्मिक’ यांच्यातर्फे आयोजित साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती कथा स्पर्धेला देशभरातून उदंड प्रतिसाद लाभला आहे. 30 सप्टेंबर या मुदतीअंती शंभरहून अधिक कथा स्पर्धेसाठी पाठविल्या गेल्या आहेत. साहित्यसेवक वसंत तावडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कथेला 11 हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार असून द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या कथांना अनुक्रमे पाच हजार आणि तीन हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. त्याशिवाय दोन कथांना 2500 रुपयांचा उत्तेजनार्थ पुरस्कारही देण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर होईल आणि विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कार विजेत्या कथा साप्ताहिक ‘मार्मिक’मध्ये प्रसिद्धही केल्या जाणार आहेत.
डॉक्टर तरुणीचा पाठलाग करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा
इस्पितळात कामावर यायच्या वेळेस तसेच कामावरून घरी जायच्या वेळेस डॉक्टर तरुणीचा पाठलाग करणाऱ्या एका तरुणाविरोधात भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल डुलगज (39) असे त्या तरुणाचे नाव असून तो विवाहित आहे. अस्वस्थ व पोटात दुखत असल्याने अनिलला 16 तारखेला भांडुपच्या शिवाजी तलाव परिसरातील एका इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्यावर ती महिला डॉक्टर उपचार करीत होती. उपचार मिळाल्यावर अनिल बरा झाल्यावर त्याला इस्पितळातून सोडण्यात आले. त्यानंतर अनिल सातत्याने त्या डॉक्टर महिलेचा कामावरून घरी जाताना तसेच कामावर येत असताना पाठलाग करू लागला. अनिलची ही वर्तणूक गैर असल्याने त्या महिला डॉक्टरने भांडुप पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.