उद्यान देखभालीच्या कंत्राटात कोटय़वधींचा घपला, 24 वॉर्डांसाठी परिमंडळ स्तरावर निविदा मागविल्या; पालिकेचे करोडोंचे नुकसान

मुंबई महानगरपालिकेने उद्यान देखभालीच्या कामात बदल करीत 24 वॉर्डांच्या कामासाठी एकत्र काढण्यात येणाऱ्या निविदा आता सातपैकी तीन परिमंडळांसाठी आणि उर्वरित वॉर्डांसाठी स्वतंत्र कंत्राटदाराची निवड केल्याने ही कामे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. वॉर्डांसाठी एकत्र मागवलेल्या निविदेत पालिकेला याआधी 20 ते 38 टक्क्यांपर्यंत उणे दरात काम करून मिळत होते. मात्र नुकत्याच काढलेल्या निविदांमध्ये फक्त 12 ते 16 टक्के उणे दराने कंत्राट देण्यात आले आहे. यामुळे देखभालीच्या कंत्राटात कोटय़वधीचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत असून चौकशीची मागणीही करण्यात येत आहे.

आजवर 24 वॉर्डकरता 23 कंत्राटदारांची निवड केली जात असताना उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी काही ठराविक कंपन्यांना लाभ देण्यासाठी तीन परिमंडळांसाठी स्वतंत्र निविदा काढली आणि उर्वरीत वॉर्डांसाठी स्वतंत्र निविदा काढली. त्यामुळे जिथे आजवर 24 वॉर्डकरिता स्वतंत्र निविदा काढण्यात येत होती, त्या ठिकाणी तीन परिमंडळांकरिता स्वतंत्र निविदा का काढली याची चौकशी करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

असा झाला घोटाळा

यापूर्वी परिमंडळ-1मधील ए, बी, सी आणि ई यांच्यासाठी स्वतंत्र निविदा काढली जात होती. तिथे आता एकत्रपणे परिमंडळ-1साठी निविदा काढली. तसेच एच पूर्व, एच पश्चिम आणि के पूर्व या परिमंडळ-3, एल, एम पूर्व अणि एम पश्चिम या परिमंडळ 5 मधील वॉर्डांसाठी स्वतंत्र निविदा न काढता परिमंडळनिहाय काढण्यात आली आहे. n विशेष म्हणजे या परिमंडळ 1, 3 आणि 5 मधील या निविदांमध्येच केवळ 3 कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे आणि वॉर्डांच्या निविदांमध्ये पाच ते सहा कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे परिमंडळांसह के पश्चिम विभागांच्या निविदांमध्येच कंत्राटदारांनी संगनमत करून काम मिळवल्याची शंका उपस्थित होत आहे.