रिव्हॉल्व्हरची चुकून गोळी सुटल्याने अभिनेता गोविंदा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जुहू पोलीस अभिनेता गोविंदाचा जबाब नोंदवणार आहेत. जबाबानंतर काही बाबीचा उलगडा होणार आहे. बॉलीवूड अभिनेता गोविंदा हा जुहू परिसरात राहतो. मंगळवारी पहाटे गोविंदा त्याच्या रूममध्ये एकटाच होता. तो विमानाने कोलकाता येथे जाणार होता.
कोलकाता येथे जाण्याची तयारी करत असताना तो कपाटात रिव्हॉल्व्हर ठेवत होता. अचानक रिव्हॉल्व्हर खाली पडल्याने गोळी सुटली. ती गोळी गोविंदाला लागल्याने तो जखमी झाला. या घटनेची माहिती समजताच सुरक्षेसाठी असलेले पोलीस तेथे आले व गोविंदाला खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या गोविंदावर उपचार सुरू आहेत.
उपचार सुरू असल्याने पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला नाही. गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर पोलीस जबाब नोंदवणार आहेत. जबाब नोंदवल्यानंतर नेमकी काय घटना घडली हे स्पष्ट होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. घडल्याप्रकरणी पोलिसांनी गोविंदाच्या मुलगीचा जबाब नोंदवला आहे. ज्या रिव्हॉल्व्हरवरून गोळी सुटली आहे ती रिव्हॉल्व्हर परवाना असलेली आहे. घडल्याप्रकरणी पोलिसांनी डायरी नोंद केली आहे.