शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होणार आहे. आमदारांना अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आव्हान दिले आहे. या याचिकेवर नऊ महिन्यांत 16 तारखा पडल्या. त्यामुळे गुरुवारी होणाऱया सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे सिरिअल क्रमांक 33 वर याचिका सूचिबद्ध करण्यात आली आहे.
‘घडय़ाळ’ गोठवण्याबाबत 15 ऑक्टोबरला सुनावणी
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात नव्याने अर्ज केला आहे. अजित पवार गटाला मिळालेली ‘घडय़ाळ’ निशाणी गोठवा व त्यांना नवीन निशाणी वापरण्याचे निर्देश द्या, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. याबाबत न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे खंडपीठ 15 ऑक्टोबरला सुनावणी घेणार आहे.