Badlapur Sexual Assault : कोर्टाने फटकारताच चोवीस तासांत कोतवाल आणि आपटेला अटक

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी पोक्सोचा गुन्हा दाखल झालेले शाळेचे संचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्या तब्बल दीड महिन्यानंतर ठाणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी या दोघांनाही का अटक करत नाही असे खडे बोल सुनावत पोलिसांना प्रचंड झापले होते. त्यांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला. त्यानंतर अवघ्या चोवीस तासांत पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान एसआयटीच्या ताब्यात देऊन या दोघांनाही उद्या गुरुवारी कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर देशभरात गदारोळ झाला होता. शाळेतील व्हिडीओ फुटेज डिलीट करणे, या प्रकरणाची लपवाछपवी करणे, पोलिसांना माहिती न देणे या गुह्याखाली शाळेचे संचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावर कल्याण न्यायालयाने 20 ऑगस्ट रोजी पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दुसऱयाच दिवशी कोतवाल आणि आपटे हे दोघेही फरार झाले होते. सुरूवातीला त्यांनी कल्याण सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. मात्र तो फेटाळण्यात आल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती.

मुंबई उच्च न्यायालयानेही मंगळवारी झालेल्या सुनावणीत पोलिसांना फटकारले होते. पोलीस आरोपींचा जामीन मंजूर होण्याची वाट पाहत आहेत का, असे खडे बोल सुनावत न्यायालयाने दोघांचाही जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर अवघ्या चोवीस तासांत ठाणे गुन्हे शाखा परिमंडळ 4 च्या पोलिसांनी या दोघांनाही अटक केली.

आपटेच्या फार्महाऊसवर दोघेही लपले

कर्जत तालुक्यात गौरकामत येथे तुषार आपटे याचे फार्म हाऊस असल्याची चर्चा आहे. या फार्म हाऊसवर दोघेही लपून बसल्याचा संशय व्यक्त होत आहे.

पकडले की शरण आले?

जरळपास दीड महिन्यांपासून फरार असलेले उदय कोतवाल आणि तुषार आपटे हे न्यायालयाच्या दट्टय़ानंतर अवघ्या चोवीस तासात पोलिसांच्या हाती लागल्याने पुन्हा अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी त्यांना पकडले की ते स्वतःहून शरण आले याची चर्चा होऊ लागली आहे.

वडापाव खाताना उचलले

आज ठाणे गुन्हे शाखा युनीट क्रमांक 4 च्या पथकाला तुषार आपटे याचे मोबाईल लोकेशन ट्रेस झाले. हे दोघे कोणाला तरी भेटण्यास वांजळे गावात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा लावला. सायंकाळी 6 वाजता तुषार आपटे आणि उदय कोतवाल हे दोघेही कर्जतजवळील वांजळे गावात हडप वडापाव सेंटर येथे वडापाव खात असतानाच त्यांच्यावर पोलिसांनी झडप घातली.