
नवरात्रोत्सवात मोठय़ा संख्येने भाविक मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात येत असतात. महालक्ष्मी व भायखळा स्थानक रेल्वे स्थानकापर्यंत लोकलने येऊन पुढील प्रवासासाठी बेस्ट उपक्रमाच्या बसगाडय़ांचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावर बेस्टच्या विशेष गाडय़ा 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत चालविण्यात येणार आहेत. बेस्ट बसमार्ग 37, 57, 151, ए-63, ए-77, ए-77 जादा, ए-357, 83 या बसमार्गावर दररोज 23 अतिरिक्त बसगाडय़ा चालवण्यात येतील. भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱयांची बस स्थानकावर नियुक्ती करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त लोकल प्रवाशांसाठी प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) येथून महालक्ष्मी मंदिरात जाण्याकरिता गर्दीच्या वेळी लालबाग, चिंचपोकळी रेल्वे स्थानकमार्गे विशेष बससेवा चालवण्यात येणार आहेत.