वाराणसीपाठोपाठ लखनौमध्येही साईबाबा हटाओ मोहीम! अखिल भारतीय हिंदू महासभेचा फतवा

‘सबका मालिक एक है’ असा विश्वजागर करणारे महान संत साईबाबा यांना वाराणसीपाठोपाठ लखनौतूनही विस्थापित करण्यात आले आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने लखनौतील सर्व मंदिरांमधून साईबाबांच्या प्रतिमा तसेच मूर्ती काढून टाकण्याचे फर्मान सोडले आहे. दरम्यान, काशीतील मंदिरांमधून काढण्यात आलेल्या साईबाबांच्या मूर्ती गंगेत टाकून देण्यात आल्याचे संतापजनक वृत्त आहे.

साईबाबांची पूजा करणे म्हणजे प्रेताची पूजा करण्यासारखे आहे, असे विखारी मत व्यक्त करीत केंद्रीय ब्राह्मण सभेने वाराणसीतील सर्व मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती तसेच प्रतिमा काढून टाकण्याचा फतवा काढला. त्यानुसार सनातन रक्षक दलाने 18 मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती काढल्या. या मूर्ती पांढर्‍या कापडात गुंडाळून गंगेत सोडून देण्यात आल्या. केंद्रीय ब्राह्मण सभेने काढलेल्या साईबाबाविरोधातील फतव्याचे लोण लखनौमध्येही पोहोचले आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने सर्व मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती काढून टाकण्यात याव्यात, असे फर्मान सोडले आहे.

सनातन धर्मात साईबाबांची पूजा सांगितलेली नाही. साईबाबांची पूजा म्हणजे प्रेताची पूजाच आहे. मंदिरामध्ये भुताची पूजा कशी होऊ शकते? असा प्रश्न उपस्थित करून केंद्रीय ब्राह्मण सभेने कोणत्याही शास्त्रात साईबाबांच्या पूजेचा उल्लेख नाही, असेही म्हटले आहे. काशीतील बडा गणेश मंदिरातून साईमूर्ती हटवण्यात आली असून तेथे माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. लोकांनी आपल्या घरात साईबाबांची पूजा करण्यास हरकत नसल्याचे सनातन रक्षक दलाचे प्रदेशाध्यक्ष अजय शर्मा यांनी सांगितले. आम्ही शंभर मंदिरांची यादी बनवली असून प्रत्येक मंदिरात जाऊन आम्ही साईबाबांची मूर्ती काढण्याची सूचना केली असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

अज्ञानामुळे लोक साईबाबांच्या भक्तीमध्ये लिन झाले होते असे बडा गणेश मंदिराचे महंत रम्मू गुरू म्हणाले. अन्नपूर्णा मंदिराचे महंत शंकर पुरी यांनी मूर्ती काढण्याचे समर्थन केले. शास्त्रांमध्ये साईबाबांच्या मूर्तीची पूजा करण्याचे सांगितलेले नाही, असे ते म्हणाले.