अजित पवार गटाचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिला आणि शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी चांगल्या मुली नोकरदारांना, दोन नंबरच्या काळ्या मुली पानवाले, किराणा दुकानदारांना आणि तीन नंबरच्या मुली शेतकऱ्यांना मिळतात असे म्हटले आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून विरोधकांनी टिकेची राळ उठवली आहे.
देवेंद्र भुयार हे अमरावतीतील मोर्शी मतदारसंघाचे आमदार आहेत. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, पोरगी पाहिजे असेल तर पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी जर स्मार्ट हवी असेल तर तुमच्या, माझ्यासारख्या पोरांना भेट नाही, तर नोकरीवाल्याला भेटते. दोन नंबरची पोरगी पानाचा ठेला, धंदा, किराणा दुकान आहे अशांना भेटते आणि तीन नंबरचा गाळ, राहिलेली पोरगी शेतकऱ्यांच्या पोरांना भेटते. शेतकऱ्यांच्या पोरांचे काही खरे राहिले नाही.
भुयार यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भुयार यांचा व्हिडीओ शेअर करत सरकारवर हल्ला चढवला. देवेंद्र भुयार यांचे हे वाह्यात वक्तव्य फक्त महिलांचाच अवमान नाही तर कृषीक्षेत्रामध्ये राबणाऱ्या भूमिपुत्रांची अवहेलना तथा कृषीक्षेत्राबद्दल अनास्था निर्माण करणारे, शेतकऱ्यांची टिंगल उडवणारे आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांच्याकडून या वाचाळवीरांना अजिबात आवर घातला जात नाही हे दुःखद आहे, असे ट्विट अंधारे यांनी केले.
देवेंद्र भुयारचे हे वाह्यात वक्तव्य फक्त महिलांचाच अवमान नाही तर कृषीक्षेत्रामध्ये राबणाऱ्या भूमिपुत्रांची अवहेलना तथा कृषीक्षेत्राबद्दल अनास्था निर्माण करणारे, शेतकऱ्यांची टिंगल उडवणारे आहे.
शिंदे-फडणवीस-पवार यांच्याकडून या वाचाळ वीरांना अजिबात आवर घातला जात नाही हे दुःखद आहे. pic.twitter.com/wKVPAlGs6D— SushmaTai Andhare (@andharesushama) October 2, 2024
अजितदादांनी परवाच इथे कार्यक्रम घेतला. महिलांच्या मतांसाठी महायुतीची चढाओढ सुरू आहे. त्या गोंधळात त्यांची मानसिकता दिसून येत आहे. महिला उपभोगायचे साधण नाही. महिला जननी आहे. त्यांची गरीब, श्रीमंत, काळी, गोळी अशी वर्गवारी करू नाही शकत. लाज वाटायला हवी आमदारांना. अजितदादांनी अशा आमदारांना आवरावे, अशा शब्दात काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी आपला संताप व्यक्त केला.