हिंदुस्थान आणि चीन मधील तणाव कायम असून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या घटनेनंतर यात वाढ झाली आहे. चीनकडून वारंवार घुसखोरीचा प्रयत्न होतो, सीमेवरील भाग गिळंगृत करण्यचे प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे हिंदुस्थान आणि चीनमध्ये सीमाभागातील तणाव कायम आहे. अशातच चीनसोबतच्या संबंधांबाबत हिंदुस्थान सरकारची भूमिका समोर आली आहे. हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी सांगितले की, ‘जोपर्यंत सीमेवर सैन्य तैनात आहे तोपर्यंत हिंदुस्थान आणि चीनमधील तणाव कायम राहील’. 2020 मध्ये चीनने सीमेवर शांतता कायम ठेवण्याच्या कराराचे उल्लंघन केल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
अमेरिकेतील कार्नेगी एन्डॉमेंटने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केले. 2020 मध्ये गलवान खोऱ्यापासून पँगॉन्ग सरोवराजवळील फिंगर क्षेत्रापर्यंत चिनी सैन्याने अनेक भागात घुसखोरी केल्यानंतर हिंदुस्थान आणि चीन समोरासमोर उभे ठाकले आहेत.
हिंदुस्थान आणि चीन यांच्यातील संबंधांबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘चीनशी असलेल्या आमच्या संबंधांच्या बाबतीत, मला वाटते की ही एक लांबलचक गोष्ट आहे, परंतु थोडक्यात सांगायचे तर आमच्यात सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात करार झालेले होते. 2020 मध्ये चीनने त्याचे उल्लंघन केले. दोन्ही बाजूंना सैन्याच्या तुकड्या तैनात आहेत, त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे आणि जोपर्यंत त्या ‘फॉरवर्ड डिप्लॉयमेंट्स’कडे लक्ष दिले जात नाही तोपर्यंत तणाव कायम राहील. त्यामुळेच गेल्या चार वर्षांपासून आमच्यात चांगले संबंध तयार झाले नाही’.
सीमेवर हिंदुस्थान-चीन संघर्ष सुरूच आहे कारण लष्करी आणि मुत्सद्दी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र यात कोणतेही यश आलेले नाही. त्यामुळे तणाव कायम आहे.
जयशंकर यांनी जोर देऊन सांगितलं की जागतिक उत्पादनात चीनचा वाटा सुमारे 31-32 टक्के आहे आणि गेल्या काही दशकांमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाने, प्रामुख्याने पाश्चात्य-नेतृत्वाने, परस्पर फायद्यासाठी चीनशी सहयोग करणे निवडले असल्याने असं घडलं आहे.
चीनबाबत हिंदुस्थानच्या धोरणात्मक चित्राबद्दल विचारले असता जयशंकर म्हणाले, ‘व्यापाराचा विचार येतो तेव्हा जागतिक उत्पादनात चीनचा वाटा सुमारे 31-32 टक्के आहे. मला वाटते की ही संख्या योग्य असेल आणि बरेच काही घडले आहे कारण अनेक दशकांहून अधिक काळ, आंतरराष्ट्रीय व्यवसाय, जो प्रामुख्याने पाश्चात्य-नेतृत्वाकडे आहे, त्यांनी परस्पर फायद्यासाठी चीनशी सहयोग करणे निवडले आहे.’