शहापूर उपजिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर; केसपेपर छपाईसाठीही पैसे नाहीत

मिंधे सरकारने एप्रिलपासून रुग्णकल्याण निधीच न दिल्याने शहापूरचे उपजिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर गेले आहे. रुग्णालय प्रशासनाकडे केसपेपर छपाईसाठी पैसे नाहीत. अत्यावश्यक औषधे उधारीवर खरेदी करावी लागत आहेत. शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने हिपॅटायटीस बी व सी, डेंग्यू चाचणी करण्याचे किट, लहान बाळांसाठी लागणारे औषध यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फटका रुग्णसेवेवर झाला आहे.

निधी बंद झाल्याने साफसफाईसाठी लागणाऱ्या वस्तू, शवविच्छेदनासाठी लागणारे साहित्य, रुग्णवाहिकांसाठी इंधन, स्टेशनरी, कार्यालयीन खर्च कसा करायचा याची चिंता प्रशासनाला आहे.

रुग्णकल्याण समितीसाठी सहा महिन्यांपासून निधीच उपलब्ध झालेला नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. उधारीवरील औषधांची सात लाखांवर थकबाकी आहे.

विशेष म्हणजे शासनाच्या पुणे येथील शासकीय प्रिंटिंग प्रेसमधून केसपेपरचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने त्याचाही तुटवडा निर्माण झाला असून केसपेपरची उधारीवर छपाई करावी लागत आहे.

शासनाकडे पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने डॉक्टर, कर्मचाऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागत आहे.

प्रशासनाची तारेवरची कसरत

शहापूर उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्णांचे महिन्याकाठी किमान 20 हजार रुग्ण होत असून त्यापासून दीड लाख, सिटीस्कॅनचे सवा लाख, क्ष किरण, रक्त तपासण्या असे महिन्याकाठी किमान तीन लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र गेल्या वर्षीपासून शासनाने सर्व सुविधा मोफत केल्याने महसुली उत्पन्नच बंद झाले आहे. उत्पन्नच बंद झाल्याने व शासनाकडून निधीही उपलब्ध होत नसल्याने रुग्णालयीन प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.