नवख्या शिल्पकाराने उभारलेला मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण ताजे असतानाच बदलापूरमध्येही शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी नवख्या शिल्पकारावर तब्बल 95 लाखांचा खुर्दा उधळला आहे. अनुभव नसलेल्या कंपनीला हे पुतळे उभारण्याचे कंत्राट बहाल करताना बदलापूर नगर परिषदेने टेंडर प्रक्रियेतील सगळे नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप करीत एका ज्येष्ठ शिल्पकाराने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तरीही नगर परिषद प्रशासन कंत्राट रद्द करत नसल्याने आज संतापलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी पालिकेच्या बांधकाम विभागाला नोटांचे तोरण बांधून भ्रष्ट कारभाराचा निषेध केला.
मुख्याधिकारी मारुती गायकवाड, सिटी इंजिनीयर विजय पाटील आणि भाजप नगरसेवक शरद तेली यांचे कराहा स्टुडिओशी असलेल्या आर्थिक हितसंबंधामुळे नवख्या शिल्पकाराला काम दिल्याचा आरोप करत राजेंद्र आल्हाट बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाची दखल न घेता आपल्या निर्णयावर पालिका ठाम असल्याने आज सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी पालिकेत धाव घेत प्रशासनाचा आणि मिंधे सरकारचा निषेध केला. सत्ताधारी केवळ आर्थिक लाभासाठी मालवणची पुनरावृत्ती बदलापुरात करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी जोरदार घोषणा देत बांधकाम विभागाकडे धाव घेतली. मात्र अधिकारी आधीच पळून गेल्याने दालनाच्या दरवाजाला नोटांचे तोरण बांधून प्रशासनाचा निषेध केला.
कुठे फेडणार हे पाप?
निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाला आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात तरी भ्रष्टाचार करू नका, कुठे फेडणार हे पाप? पैसेच खायचे असतील तर आम्ही देतो. तुमच्या गळ्यात, ऑफिसला नोटांचे तोरण बांधतो असा संताप सकल मराठा समाजाचे अविनाश देशमुख, अमोल चव्हाण, श्याम शिंदे, हेमंत यशवंतराव, गिरीश राणे, नाना देशमुख, महेश भोसले, सुधीर देशमुख यांनी यावेळी केला.
नेमके प्रकरण काय?
महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी 20 ऑगस्ट रोजी शिल्पकारांकडून निविदा मागवल्या. यानुसार प्रदीप धनवे यांच्या कराहा स्टुडिओने 95 लाख 28 हजार 600, बालाजी कंपनीने 99 लाख 86 हजार, संकेत साळुंखे यांनी 97 लाख 13 हजार 200 आणि राजेंद्र आल्हाट यांच्या राज एण्टरप्रायजेस यांनी 63 लाख 13 हजारांची निविदा भरली. आल्हाट यांची निविदा 32 लाख 15 हजारांनी कमी असतानाही अनुभव नसणाऱ्या कराहा स्टुडिओला काम दिल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.