भिंत तोडून कंटेनर आश्रमशाळेत घुसला; डहाणूच्या तवा येथील थरारक घटना

मुंबईहून गुजरातकडे जाणारा भरधाव कंटेनर डहाणूजवळील तवा आश्रमशाळेची भिंत तोडून आत घुसला. ही थरारक घटना पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने आश्रमशाळेतील सर्व मुले अंघोळीला गेल्याने मोठी दुर्घटना टळली. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचाच प्रत्यय या सर्वांना आला.

आदिवासी विकास प्रकल्पाची तवा येथे एक आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत 380 मुले शिकतात. त्यातील काही मुले ही या आश्रमशाळेत मुक्कामी राहतात. आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद मार्गावरून सुरतकडे जाणाऱ्या कंटेनरचे स्टेअरिंग लॉक झाले आणि हा भरधाव कंटेनर थेट आश्रमशाळेची संरक्षक भिंत तोडून आत घुसला. सकाळची वेळ असल्याने सर्व मुले अंघोळीला गेली होती. अंघोळ झाल्यानंतर ही मुले मैदानी खेळ खेळतात. त्यामुळे शाळेतील खोलीत कोणीही नसल्याने सुदैवाने भयंकर दुर्घटना टळली. 23 सप्टेंबर रोजी याच आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भरधाव ट्रकने चिरडले होते. दरम्यान, कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कासा पोलीस ठाण्याचे अधिकारी नामदेव मांदळे यांनी दिली.