कर्जाच्या आमिषाने दोन कोटींना फसविले, ठाण्यातील चौघांवर गुन्हा

कोट्यवधी रुपये कर्जाचे आमिष दाखवून तब्बल दोन कोटी 19 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार तासगाव तालुक्यात घडला. याप्रकरणी शिरीषकुमार देशपांडे, श्रीकांत चव्हाण, सोनल देशपांडे, सूर्यकांत नंदकिशोर शर्मा (सर्व रा. अरुणराव देशपांडे फ्लॅट नं. 14, बिल्डिंग सी.डी-63, श्रीरंग रोड, ठाणे) यांच्यावर तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दीपक नेताजीराव मोरे (रा. बिरणवाडी, ता. तासगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

1 जानेवारी 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत तासगाव येथील सरस्वतीनगर (वासुंबे) येथे फिर्यादी दीपक मोरे यांना विविध फायनान्स कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले. मोरे यांचा विश्वास संपादन करीत त्यांच्या बँक खात्यामार्फत व रोख स्वरूपात दोन कोटी 26 लाख 100 रुपये संशयितांनी घेतले.

मात्र, कोणत्याही फायनान्स कंपनीचे कर्ज मंजूर न करता संशयितांनी संगनमत करून फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोरे यांनी पैसे परत मागितले, तेव्हा 7 लाख रुपये 8 मे 2024पर्यंत टप्प्याटप्प्यात परत दिले. उर्वरित रक्कम दोन कोटी 19 लाख 100 रुपये परत दिले नाहीत. मोरे यांना एसबीआय व डून व्हॅली फायनान्स अॅण्ड लेझीग लिमिटेड या फायनान्स कंपनीचे कर्ज मंजुरीचे बनावट पत्रक दिले. 2 कोटी 19 लाख 100 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मोरे यांनी फिर्याद दिली.