आरोपींना शोधण्यास पोलिसांना अपयश, नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचा आरोप

नगर अर्बन बँक बंद पडून एक वर्ष होत आहे. तरीही पोलीस प्रशासनाकडून कोणतीच आश्वासक कृती होत नाही. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये 105 आरोपींचा उल्लेख आहे. आतापर्यंत 15 ते 20 आरोपींचा शोध घेऊन कारवाई केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यास पोलीस अपयशी ठरले आहेत, असा आरोप नगर अर्बन बँक बचाव समितीचे डी. एम. कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केला. धनदांडग्या थकबाकीदार कर्जदारांची नावे वर्तमानपत्रात जाहीर करण्याची प्रक्रिया येत्या दोन दिवसांत सुरू होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा उपस्थित होते.

नगर अर्बन बँकेतील घोटाळा राज्यभर गाजत आहे. दोन वर्षांपूर्वी दाखल केलेल्या फिर्यादीची अजूनही गंभीरतेने दखल घेतली नाही. काही आरोपी नगर शहरात राजरोसपणे वास्तव्य करीत आहेत. पोलिसांना संपर्क केला जातो. मात्र, ते तत्काळ उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे आरोपी पसार होतात. आरोपींना पोलिसांचे छुपे संरक्षण असल्याचे दिसत आहे, असा आरोपही कृती समितीने केला आहे.

या प्रकरणात कृती समितीने पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेचे संचालक व कर्जदारांच्या स्थावर मालमत्ता जप्तीची कार्यवाही करावी, अशी सूचना करून त्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पत्रव्यवहार केला आहे. पोलीस अधीक्षकांकडून 40 ते 45 स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाई झाल्याचे समजते. मात्र, मालमत्ता जप्तीसह लिलाव प्रक्रिया होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे अद्याप प्रस्ताव दाखल नाही. त्यानंतर शासनस्तरावर मंजुरी होऊन लिलाव प्रक्रिया करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती व लिलाव प्रक्रिया अंतिम कधी होणार? त्यातून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी केव्हा परत मिळणार हा प्रश्नच आहे, असे कुलकर्णी यांनी म्हटले.